केवळ 5 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड : उत्पादन घटण्याची भीती, आवकेवर परिणाम
बेळगाव : यंदा पावसाला दीड महिना उशिराने प्रारंभ झाल्याने भाजीपाला लागवडीत मोठी घट झाली आहे. आतापर्यंत केवळ 26 टक्केच भाजीपाला लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजीपाल्याची आवक कमी होऊन दरात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना वाढीव दराचे चटके सहन करावे लागणार आहेत. राज्यात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन बेळगाव जिल्ह्यात होते. दरवर्षी 25 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भाजीपाला लावला जातो. केवळ बेळगावातच नव्हे तर महाराष्ट्र आणि गोवा राज्यालादेखील भाजीपाला पुरविला जातो. उन्हाळ्यात आणि पावसाला सुरुवात होताच भाजीपाला लागवड केली जाते. मात्र यंदा जूनमध्ये म्हणावा तसा पाऊस झाला नाही आणि जुलैचा पहिला पंधरवडादेखील पाऊस बरसला नाही. त्यामुळे भाजीपाला लागवड थंडावली आहे. आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर भाजीपाला लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. गतवर्षी जुलैअखेरपर्यंत बीट, कोबी, फ्लॉवर, वाटाणे आणि इतर भाज्यांची 18 हजार 784 हेक्टरांत पेरणी झाली होती. बागायत खात्याने यंदा 21832 हेक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवडीची उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत 5847 हेक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाल्याच्या लागवडीत घट झाली आहे. केवळ 26.78 टक्केच भाजीपाला लागवड करण्यात आली आहे.
भाजीपाला उत्पादनास उशीर
साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाल्याची लागवड केल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्पादन होते. त्यानंतर त्याचठिकाणी मका, चवळी आणि इतर पिकांची पेरणी केली जाते. मात्र यंदा भाजीपाला लागवड उशिराने झाल्याने काढणीलादेखील उशीर होणार आहे. त्यामुळे पुढील पीक घेताना समस्या निर्माण होणार आहे. पाऊस सुरळीत न झाल्यास पुढील पीक घेण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केलेल्या भाजीपाल्याचे अति पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटो, हिरवी मिरची व इतर भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने दरवाढ होऊ लागली आहे. शिवाय येत्या काळात पुन्हा भाज्यांचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाऊस उशिरा दाखल झाल्याने बटाट्याची लागवड कमी
दरवर्षी आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात पन्नास ते साठ पोती बटाट्याची लागवड करत होतो. मात्र यंदा पाऊस उशिराने दाखल झाल्याने केवळ 16 पोती बटाट्याची लागवड केली आहे. त्यामुळे लागवड केलेल्या बटाटा पिकांचे उत्पादनदेखील उशिराने होणार आहे. त्याचा परिणाम पुढील ज्वारी पिकविणाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे.
– लक्ष्मण बडवाण्णाचे (शेतकरी चलवेनहट्टी)
यंदा भाजीपाला लागवडीचे प्रमाण कमी
यंदा मान्सून पाऊस लांबणीवर पडल्याने भाजीपाला लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून ऊस आणि इतर पिके घेतली आहेत. शिवाय काही ठिकाणी मका आणि सोयाबीन पेरणी केली आहे.
– महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते









