बसफेऱ्या कमी केल्यामुळे प्रवाशी ताटकळत, प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार
बेळगाव : शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये महिलांची संख्या वाढू लागली आहे. दरम्यान, विविध ठिकाणी भेटी देण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्यादेखील कायम आहे. त्यामुळे बसथांबे पुरुषांपेक्षा महिलांच्या संख्येने गजबजू लागले आहेत. दुसरीकडे मात्र या योजनेमुळे बसफेऱ्यांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. महिलांसाठी सुखकर झालेली शक्ती योजना इतर प्रवाशांसाठी वेदनादायी होऊ लागली आहे. 11 जूनपासून राज्यात शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे सामान्य महिला, नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींचा मोफत प्रवास सुसाट सुरू झाला. या योजनेंतर्गत राज्यात कोठेही फिरता येते. त्यामुळे पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे आणि इतर ठिकाणी फिरणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: वर्षापर्यटनासाठीदेखील महिला बाहेर पडू लागल्या आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांत प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
बेळगाव आगारात दैनंदिन 650 हून अधिक बस विविध मार्गावर धावतात. मात्र, शक्ती योजनेला प्रतिसाद वाढत असल्याने बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. दरम्यान, महिलांना मोफत प्रवासासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. तर काही गावच्या बसेस अनियमित झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषत: पासधारक विद्यार्थ्यांना आणि महिलांना त्याचा फटका बसू लागला आहे. पास असूनदेखील विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. या परिवहनच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शक्ती योजना सुरू झालेल्या महिन्यातच धार्मिकस्थळे आणि पर्यटनस्थळे महिलांनी फुल्ल झाली होती. केवळ मोफत बससेवेचा परिणाम दिसून आला होता. सुरुवातीच्या महिन्यात बसमध्ये गर्दीदेखील झाली होती. आसने पकडण्यासाठी महिलांमध्ये वादावादीचे प्रकार देखील घडले होते. त्यानंतर काही काळ बससेवा सुरळीत झाली होती. मात्र, आता पर्यटनस्थळे आणि पावसाळी पर्यटनासाठी महिलांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी धावणाऱ्या बससेवेवर परिणाम होऊ लागला आहे.









