अज्ञात जीवांच्या प्रजातींचा लागू शकतो शोध
चीनमध्ये निसर्गाचा एक चमत्कार दिसून आला आहे. येथे एक सिंकहोल म्हणजेच खड्ड्यात आढळून आला असून तो 600 फूट खोल आहे. या खड्ड्याला पाहून जणू ते पाताळलोक असल्याचे वाटते. चीनमधील या सिंकहोलमध्ये एका विशाल प्राचीन वनाचा शोध लागला आहे.

वैज्ञानिकांच्या एका संशोधन पथकाला चिनी जियोपार्कमध्ये भूमिगत रहस्याचा शोध लागला होता. या घटनेला चीनमध्ये ‘तियानकेंग’ किंवा ‘स्वर्गीय खड्ड्’ या नावानेही ओळखले जाते. लेये फेंगशान युनेस्को ग्लोबल जियोपार्कमध्ये हा सिंकहोल आढळला आहे. हे जियोपार्क चीनमधील गुआंग्शी जुआंग या प्रांतात आहे.
जियोपार्कला गुहांचे क्षेत्र तसेच जगातील सर्वात लांब नैसर्गिक पूल असण्यासाठी ओळखले जाते. हे प्राचीन जंगल सध्या अज्ञात असलेले वृक्ष तसेच प्राण्यांचा अधिवास असू शकते. चीनमध्ये यापूर्वी अनेक सिंकहोल आढळून आले आहेत. चीनमध्ये एकूण 30 सिंकहोल असल्याचे एका वैज्ञानिकाने सांगितले आहे.
सिंकहोलच्या आत अत्यंत संरक्षित प्राचीन जंगल आहे. तसेच सिंकहोलमध्ये तीन गुहा आहेत. सिंकहोलची लांबी 306 मीटर, रुंदी 150 मीटर आणि खोली 192 मीटर इतकी आहे. अधिकृतपणे याला मोठा सिंहकोल ठरविले जाऊ शकते असे चायना जियोलॉजिकल सर्व्हेच्या इन्स्टीट्यूट ऑफ कार्स्ट जियोलॉजीचे वरिष्ठ इंजिनियर झांग युआनहाई यांनी सांगितले आहे.

सिंकहोलमधील प्राचीन वृक्ष सुमारे 40 मीटर उंच असून त्यात आढळलेले जंगल असाधारण आहे. छिद्राच्या आकारामुळे जंगल वाढण्यास सक्षम होते, यामुळे खोल भागातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत होता असे सांगण्यात आले.









