पुणे / प्रतिनिधी :
काँग्रेसमधील काही ठरविक लोकांनी मला लक्ष्य करून पक्षाच्या बाहेर ढकलले आहे. परंतु, आमच्या रक्तात व विचारात फक्त काँग्रेस आहे. शंभर वर्षांपासून आम्ही काँग्रेससोबत जोडले गेले आहोत. मला काही लोकांनी बाहेर ढकलले असेल, तर माझ्याशी संवाद साधणे, ही पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे, अशी भूमिका मांडत विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षात परतण्याचे शुक्रवारी संकेत दिले.
पुण्यात आले असता ते बोलत होते. तांबे म्हणाले, निवडणुकीच्या काळात जो काही एपिसोड झाला तो आपल्या सगळय़ांच्या समोर आहे. कशा पद्धतीने माझ्याबरोबर राजकारण झाले आणि कशा पद्धतीने पक्षातून मला बाहेर ढकलण्यात आले, हे सर्वांनी पाहिले आहे. मी काही एकटाच नाही, तर देशात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना नेत्यांकडून ठरविक ठिकाणी टार्गेट करून ढकलण्यात येत आहे. ही चिंतेची बाब असून यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत राजकारणाची पातळी खालवली आहे. यामुळे नवे राजकारण सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.








