पुणे / प्रतिनिधी :
ऑगस्टमधील पावसाची स्थिती अशीच राहणार असून, आता सप्टेंबरमध्येच दमदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्वांनाच आता पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जूनमध्ये ओढ दिल्यानंतर पावसाने जुलैमध्ये दमदार बॅटिंग केली. मात्र, ऑगस्टमध्येही पावसाने ताण दिल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील एकाही जिल्हय़ात ऑगस्टमध्ये प्लसमध्ये पाऊस झालेला नाही. ही तूट मोठी असल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता सर्व भिस्त ही सप्टेंबरच्या पावसावर राहणार आहे. ऑगस्ट महिना संपण्यास अवघा एक आठवडा उरला आहे. या काळातही राज्यात पावसाची शक्यता दिसत नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कसा पाऊस राहणार, यावरच सर्व चित्र अवलंबून असणार आहे.
प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव दिसून येत आहे. अल निनो वर्षात दुष्काळ पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. याशिवाय या स्थितीत समाधानकारक पाऊस झाल्याचीही उदाहरणे सापडतात. मात्र, सध्याची पावसाची स्थिती पाहता अल निनो हा घटक प्रभावी ठरल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. जून ते सप्टेंबर हे चार महिने प्रामुख्याने पावसाचे मानले जातात. त्यात जुलै व ऑगस्टमध्ये बव्हंशी पावसाचा जोर अधिक असतो. मात्र, आता केवळ सप्टेंबर महिन्याकडून शेतकऱ्यांना आशा असेल. याशिवाय राज्यातील काही धरणांमध्ये अद्यापही पुरेसा साठा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात पाऊस कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
तुरळक पावसाची शक्यता
पुढच्या 30 ऑगस्टपर्यंत कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाडय़ात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मागच्या 24 तासांत नागपूर वगळता सर्वत्र तुरळक ते हलक्या पावसाची नोंद झाली.
दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी
दरम्यान, महाराष्ट्रात जून आणि जुलैमध्ये पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यातदेखील सरासरीपेक्षा 68 टक्के पाऊस कमी झाला आहे. राज्यातील सर्वच विभागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील ही परिस्थिती भीषण आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे. त्यांनी हे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करून केले आहे.