टायब्रेकरमध्ये 1.5-0.5 फरकाने सरशी, पहिल्या सामन्यात कार्लसनचा विजय, : तर दुसरा सामना बरोबरीत, विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याची कार्लसनची पहिलीच खेप
वृत्तसंस्था /बाकू (अझरबैजान)
फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील गुरुवारी झालेल्या टायब्रेकरमध्ये भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदला गेल्या काही दिवसांतील त्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि मॅग्नस कार्लसनने त्याला टायब्रेकरमध्ये 1.5-0.5 फरकाने पराभूत करून फिडे विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. स्पर्धेतील प्रज्ञानंदचे स्वप्न शेवटी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या कार्लसनने भंग केले. अंतिम फेरीतील पहिले दोन सामने बरोबरीत राहिल्यानंतर विजेता ठरविण्यासाठी टायब्रेकरची मदत घ्यावी लागली होती. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला नॉर्वेचा सुपरस्टार कार्लसन एका दशकाहून अधिक काळापासून या खेळात अव्वल असून त्याचे हे पहिलेच विश्वचषक विजेतेपद आहे. कार्लसनने रॅपिड प्रकारातील पहिला सामना जिंकताना उत्तम कौशल्याचे प्रदर्शन घडविल्यानंतर टायब्रेकरच्या दुसऱ्या गेममध्ये सावध व सुरक्षित पवित्रा घेतला. हा दुसरा सामना 22 चालींमध्ये बरोबरीत संपला. पहिल्या गेममध्ये चुरशीची लढत झाल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये लगेच मागे पडलेल्या प्रज्ञानंदने बरोबरीस सहमती दिली. त्यामुळे ‘ब्लिट्झ’ सामन्याची आवश्यकता भासली नाही.
मंगळवारी आणि बुधवारी झालेले दोन क्लासिकल पद्धतीचे सामने बरोबरीत संपले होते. कार्लसनची अन्नातून झालेल्या विषबाधामुळे परिस्थिती ठीक नव्हती त्यामुळे पहिल्या क्लासिकल गेममध्ये त्याच्या हातून सर्वोत्तम खेळ झाला नव्हता. मात्र त्याने टायब्रेकरमध्ये उल्लेखनीय पुनरागमन करत आपल्याला हरवणे का कठीण आहे, ते दाखवून दिले. त्याने पहिल्या टायब्रेकर गेममध्ये आपल्या 18 वर्षीय भारतीय प्रतिस्पर्ध्याचे कठीण आव्हान मोडून काढत 45 चालींमध्ये विजय मिळवला. हा सामना कधी कार्लसन, तर कधी प्रज्ञानंदच्या बाजूने फिरत होता. मात्र पहिल्या गेममध्ये वेळेच्या दडपणाखाली येऊन भारतीय खेळाडूने हार पत्करली. आपली चूक कळल्यानंतर आणि सामना आपल्या हातून निसटला आहे याची कल्पना आल्यानंतर प्रज्ञानंदने ही भूमिका घेतली. त्यानंतर कार्लसनने दुसऱ्या गेममध्ये पांढऱ्या प्याद्यांसह खेळण्याच्या अनुकूलतेचा पुरेपूर वापर केला. या गेममध्ये जिंकणे आवश्यक बनलेले असताना प्रज्ञानंद सुरुवातीलाच वेळेच्या दबावाखाली आला आणि सामना अनिर्णीत अवस्थेत सोडविण्यास त्याने सहमती दर्शविली.
पाच वेळा विश्वविजेत्या राहिलेल्या विश्वनाथन आनंदने या अंतिम फेरीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया करताना नमूद केले की, प्रज्ञानंद ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील स्थानाच्या जोरावर आणि अप्रतिम निकालासह पुनरागमन करू शकतो. त्याने कार्लसनचे अभिनंदन करताना लिहिले आहे, ‘शेवटी, तो मॅग्नस आहे. त्याच्या चिकाटीचे फळ त्याला आतापर्यंत हुलकावणी दिलेल्या एकमेव स्पर्धेच्या जेतेपदाने मिळाले आहे. फिडे विश्वचषक 2023 विजेत्या मॅग्नस कार्लसनचे अभिनंदन’. प्रज्ञानंदचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी आपल्या प्रतिक्रियेत विश्वचषक स्पर्धेच्या पात्र जेतेपदासाठी मॅग्नस कार्लसनचे अभिनंदन केले आहे. ‘या स्पर्धेच्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि काही कठीण धडे देखील मिळाले आहेत. आता पुढे पाहायचे’, असे त्यांनी प्रज्ञानंदला उद्देशून म्हटले आहे. प्रज्ञानंदची या स्पर्धेतील कामगिरी नेत्रदीपक राहिली. या स्पर्धेतील निकालामुळे त्याला ‘कँडिडेट्स 2024’ स्पर्धेसाठी पात्र ठरण्यास मदत झाली आहे. कॅनडात होणार असलेल्या सदर स्पर्धेचा विजेता चीनचा विश्वविजेता डिंग लिरेनला आव्हान देईल. कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारा प्रज्ञानंद हा बॉबी फिशर व कार्लसन यांच्यानंतरचा तिसरा युवा खेळाडू बनला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या काऊआनाने स्थानिक ‘स्टार’ निजात आबासोव्हला टायब्रेकरमध्ये हरवून तिसरे स्थान पटकावले असून ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे आपले तिकीट निश्चित केले आहे.









