पावसाचा फटका : हिमाचलमध्ये दिवसभरात 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था /कुल्लू
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिह्यातील अनी येथे अवघ्या तीस सेकंदांमध्ये सात इमारती कोसळल्याची बातमी समोर आली आहे. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने सदर इमारती आधीच रिकामी करण्यात आल्याने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनी बसस्थानक परिसरातील अन्य दोन इमारतीही कलंडल्या असून त्या कोसळण्याची शक्मयता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मागील महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात बरीच पडझड झालेली आहे. महापूर, भूस्खलन अशा घटनांमुळे जनजीवन कोलमडून पडले आहे. आतापर्यंत 200 हून अधिक जणांचे बळी गेले असून गुरुवारपर्यंतच्या अखेरच्या 24 तासात 12 मृत्यूंची नोंद झाली आहे.

बऱ्याच भागात आजही पडझडीच्या घटना घडत असल्यामुळे लोक अजूनही जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. गुरुवारी घडलेल्या इमारत दुर्घटनाही भयावह असल्याचे स्पष्ट झाले आहे. इमारत कोसळत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या तेथील स्थानिक प्रशासन घटनास्थळी झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. या अपघातानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषत: कोसळलेल्या इमारतीच्या शेजारी असलेल्या घरांमधील लोकांना नुकसानीची अधिक चिंता आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे 23 घरे कोसळली आहेत. तर 108 घरांचे नुकसान झाले. केवळ शिमला शहरात 25 हून अधिक घरे असुरक्षित बनली आहेत. त्यामुळे 55 हून अधिक कुटुंबांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्यभरात अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि जमीन खचल्यामुळे या पावसाळ्यात 2,255 घरे कोसळली असून 9,865 घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत, तर अनेकजण आपला जीव धोक्मयात घालून अर्धवट कोसळलेल्या घरात राहत आहेत.









