मंत्र्यांच्या निवासातून 30 लाखांची रोकड जप्त
वृत्तसंस्था /रांची
छत्तीसगडपाठोपाठ आता झारखंडमध्ये मद्य घोटाळ्याचे धागेदोरे सापडू लागले आहेत. झारखंडच्या 8 जिह्यांमध्ये ईडीने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर महत्त्वाची माहिती मिळाली आहे. यासोबतच रांचीमधील एका ठिकाणाहून मंत्र्यांच्या निवासातून कोट्यावधींचे दागिने तसेच 30 लाख ऊपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावेही ईडीला मिळाले आहेत. या छाप्यानंतर मद्य घोटाळ्यातील अन्य काही धागेदोरे उघडकीस येण्याची शक्मयता असून इतर अनेक बड्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्मयता आहे. ईडीने झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर ओराव आणि त्यांचा मुलगा रोहित ओराव यांच्या रांची येथील निवासस्थानावर गुरुवारी छापे टाकले. योगेंद्र तिवारीच्या व्यवसायात रोहित ओरावच्या गुंतवणुकीची माहिती ईडीला मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. त्यांच्या घरातून सुमारे 30 लाख ऊपये जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच व्यापारी विनय सिंह यांच्या घरातून कोट्यावधींचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या छाप्यादरम्यान चौकशी केल्यानंतर आणि सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे योगेंद्र तिवारी आणि अमरेंद्र तिवारी यांना 26 ऑगस्ट रोजी रांची येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मंत्र्यांच्या निवासाव्यतिरिक्त आरती राय चौधरी, अजय केसरी, विवेक मिश्रा, अभिषेक झा, मुन्नम संजय आणि योगेंद्र तिवारी आदी धनाढ्यांच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. रांचीमध्ये 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात विनय सिंगच्या 2 ठिकाणांचा समावेश आहे.









