पिंगुळी-कुडाळहून मालवणला जाताना वाटेत धामापूर गाव वसलेला असून, कोकणातील हे निसर्गसंपन्न गाव तेथील बारामाही पाण्याने भरलेल्या मानवनिर्मित तलावामुळे विशेष नावारुपाला आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणजवळच्या चिपी विमानतळापासून जवळच वसलेला धामापूर कोकणातल्या विलोभनीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवत असून, काही दिवसांपूर्वी इथल्या जांभ्या दगडांनी युक्त महाकाय पठारावरती प्रस्तर चित्रे सापडल्याकारणाने हा गाव इतिहास आणि पुरातत्त्व संशोधकांसाठी आकर्षण ठरणार आहे. पावणाई, घाडीवंस, बाराचा पूर्वज, ब्राह्मण, रवळनाथ आणि भगवती अशा विविध देवदेवतांच्या आशीर्वचनाने समृद्ध धामापूर गावाला पूर्वापार वैविध्यपूर्ण अशा लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यात समाविष्ट असणारा हा गाव तेथील कष्टकरी शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या निर्माण केलेल्या तलावामुळे भारतभरात नावारुपाला आलेला आहे. श्रमदानाद्वारे सामूहिकरित्या येथील स्थानिकांनी विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीतल्या नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली या तलावाची निर्मिती केली होती, असा उल्लेख आहे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात 11 मीटर उंच आणि 271 मीटर लांबीचा मातीचा कल्पकरित्या बंधारा घालून 111 हेक्टर क्षेत्रफळात जलाशय निर्माण करून 110 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची क्षमता प्राप्त केलेली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जलाशयातले पाणी कालव्यातून निरंतर वाहते, पर्जन्यवृष्टीमुळे ठेवले जाते आणि त्यानंतर पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी वाहते पाणी नियंत्रित केले जाते. हिवाळ्यातील वायंगणी शेती आणि बागायती पिकांसाठी तलावातले पाणी सिंचनास वापरले जायचे. कालांतराने तलावातले पाणी झिरपून वाया जाते म्हणून 1980च्या सुमारास काँक्रीटचा वापर करण्यात आला तर 1999 पासून पारंपरिक पाटांऐवजी पीव्हीसी पाईपची पाण्याचे वितरण करण्यासाठी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. धामापूर तलावापासून 16 कि.मी. अंतरावरती वसलेल्या मालवण शहराला आणि अन्य चार गावांना पेयजलाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाईपलाईन्सद्वारे तलावातील पाणी नेण्यात येते. धामापूर गावातील जलसिंचनाची गरज भागविणाऱ्या या तलावाचा आज पेयजलाची मागणी पूर्ण करण्यासाठी उपयोग केला जातो.
धामापूरचा हा तलाव एकेकाळी तेथील गावकऱ्यांच्या श्रमदानातून निर्माण झाला होता. जांभ्या दगडांनी समृद्ध असलेल्या इथल्या कातळावरती मान्सूनात जी प्रचंड पर्जन्यवृष्टी व्हायची, ते पाणी झिरपून भूगर्भात जायचे आणि त्यामुळे तलावातल्या निर्झरातून जलाशयाला मुबलक पाण्याचा संचय व्हायचा. जुन्या काळी स्थानिक जनतेने आपल्या परिसरातल्या भौगोलिक स्थितीनुसार गावातल्या पेयजल आणि सिंचनाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी तळी, तलावाची निर्मिती केली होती. धामापूरचा तलाव हा तेथील कष्टकरी, परंतु कल्पक समाजाने नियोजनबद्धरित्या निर्माण केलेली पारंपरिक जलसंचय व्यवस्था होती. पावसात डोंगर माथ्यावरती कोसळणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी त्यांनी गावोगावी अशा जलाशयांची निर्मिती करण्यास बांध, पाट यांची व्यवस्था उभारली होती. पेंडूर, धामापूर आणि परिसरात जंगली वृक्ष-वनस्पतींचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे तसेच जलस्रोतांना प्रवाहित ठेवता यावे म्हणून तत्कालीन राजे सरदार यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचा परिपाक म्हणून धामापूर तलावासारखे बारामाही पाणी पुरवठा करणारे जलस्रोत जीवनदायी संचित ठरले होते. 2020 मध्ये जागतिक वारसा सिंचन स्थळ म्हणून अधिसूचित करण्यात आलेला धामापूरचा, महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव तलाव ठरलेला आहे, हे धामापूरवासियांच्या एकंदर दूरदृष्टीचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक या नात्याने पाहिले जाते, ही उल्लेखनीय बाब आहे.
पशुपक्षी, वृक्षवेली, कृमीकीटक आदी जैविक संपदेच्या वैविध्यपूर्ण घटकांसाठी धामापूरचा हा तलाव नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे. पर्यावरणीय मूल्यांचा आणि संवेदनशीलतेचा काडीमात्र विचार न करता तलावाच्या जलाशयात अणि एकंदर परिसरात पर्यटनाचा उपक्रम राबविला होता, तेव्हा त्याचे दुष्परिणाम या जलस्रोतावरती झाल्याचे उघडकीस आले होते. याच धामापूर गावातल्या विस्तीर्ण अशा पठारावरती कुडाळ ते मालवण रस्त्यावरून जाताना, मोगरणेच्या गिरोबा मंदिराकडून जाणारा मार्ग गोड्याची वाडीतल्या चिरेखाणींवरती जातो आणि त्याच परिसरात दोन ठिकाणी प्रस्तर रेखाचित्रांचे दर्शन घडते. सिंधुदुर्गातल्या कुडोपी, हिवाळे-खोटाले आदी ठिकाणी असलेल्या जांभ्या दगडांनी समृद्ध पठारावरती यापूर्वी प्रस्त रेखाचित्रे आढळलेली असून, तेथे आढळलेल्या प्रस्तर चित्रांत आणि धामापूर-साळेल येथील पठारावरती आढळलेल्या प्रस्तरचित्रांत बरीच भिन्नता आहे. कुडोपी, हिवाळे येथील प्रस्तरचित्रांत भौमितिक आकारांबरोबर पशुपक्ष्यांशी साधर्म्य सांगणाऱ्या कलाकृतींचे दर्शन घडलेले आहे परंतु धामापूर येथील प्रस्तर चित्रांतून सहजासहजी आकलन होऊ न शकणाऱ्या कलाकृती पाहायला मिळतात. गोड्याची वाडी येथे पशुपालक जमातीतल्या वैशाली बुटे यांनी आपण ही प्रस्तरचित्रे गेल्या वीस वर्षांपासून पाहात असून, त्यांच्या सासऱ्यांनी ही चित्रे अज्ञातवासात असताना पांडवांनी कोरलेली असल्याचे सांगितले. या पठारावर असलेल्या चिरेखाणीपासून जवळच क्रॉसशी काही प्रमाणात साधर्म्य सांगणारी चित्रकृती निदर्शनास पडलेली असून, त्याच्या बाजूलाच गोलाकार, अर्ध वर्तुळाकार स्वरुपात चित्रकृती दृष्टीस पडलेल्या आहेत. या ठिकाणाहून अर्ध्या किलोमीटरच्या परिघात आणखीन एक भव्य आकारातले कातळशिल्प कोरलेले आहे. सुरुवातीच्या कातळशिल्पांचे दर्शन घेण्यास इथे येणाऱ्या अभ्यासकांना शोधाशोध करण्यात विलंब होऊ नये म्हणून स्थानिकांनी दोन ठिकाणी चित्रकृती निदर्शनास येण्यासाठी त्यांच्या सभोवताली गोलाकार दगड मांडलेले आहेत. जगाच्या विविध भागात प्रागैतिहासिक काळापासून कातळशिल्पे आढळत असून त्यांच्यामागच्या सांस्कृतिक संदर्भाचा हेतू उलगडण्याची गरज निर्माण झाली आहे. धामापूर येथील ही कातळशिल्पे कशाची चित्रकृती आहेत, त्यातून काय व्यक्त होते, हे सध्यातरी समजणे अवघड ठरलेले आहे. इतरत्र आढळलेल्या चित्रांतून प्राणी, पक्षी, मनुष्य आदी चित्रकृतींचा बोध होत असून, धामापूर येथील ही कातळशिल्पे अगम्य आहेत. या सर्व चित्रकृती पठारावरच्या कातळाने युक्त जमिनीवरील पृष्ठभागावर आडव्या पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत. येथील कातळशिल्पातली चित्रशैली अन्यत्र आढळलेल्या शिल्पांशी प्रथमदर्शनी साम्यस्थळं दाखवित नसून, त्यातल्या भौमितीक रचनांचे प्राबल्य असून, स्वतंत्ररित्या सुरुवातीच्या कातळशिल्पापासून दूर असलेले एकमेव शिल्याची रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणारी नसली तरी हे चित्रण सादृश्य आहे, असे दिसून येते. धामापूर येथील प्रस्तरावरती निर्माण केलेली कातळशिल्पे वैविध्यपूर्ण असून, त्यांना येथील कोकण किनारपट्टीपासून घाटमार्ग त्याचप्रमाणे अन्य व्यापारी मार्गात वावरणाऱ्या मानवाच्या इतिहास आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहे. त्यादृष्टीने कातळशिल्पांचे संशोधन करण्याची गरज आहे.
– राजेंद्र पां. केरकर








