लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाने संपविला होमवर्क
उंच इमारतींमध्ये तुम्ही राहत असाल तर निश्चितच लिफ्टचा वापर करत असाल. सोशल मीडियावर बहुमजली नागरी इमारतींच्या लिफ्टशी निगडित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डिलिव्हरी बॉयजना लिफ्टचा वापर करू न देण्याची नोटीस, लिफ्टमध्ये अडकून पडण्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल केल्या जातात. लिफ्टमध्ये अडकून पडणे लोकांसाठी भीतीदायक अनुभव असतो. 5-10 मिनिटांसाठी लिफ्टमध्ये अडकून पडल्यावरही अस्वस्थ व्हायला होते. परंतु फरिदाबाद येथील एका सोसायटीत घडलेला प्रकार जाणून घेतल्यावर लोक चकित झाले आहेत. मानसा फरिदाबादच्या ओमेक्स रेसिडेन्सी सोसायटीत 8 वर्षीय मुलगा सुमारे 3 तासांपर्यंत लिफ्टमध्ये अडकून राहिला, परंतु त्याने घाबरून जाण्याऐवजी लिफ्टमध्ये आरामात बसून स्वत:चा शाळेचा तसे ट्यूशन दोन्हीकडचा होमवर्क संपविला आहे. मुलगा संध्याकाळी 5 वाजता ट्युशनसाठी 5 व्या मजल्यावरून खाली गेला हेता. तो 6 वाजेपर्यंत घरी परत यायचा, परंतु 7 वाजल्यावरही तो न परतल्याने कुटुंबीयांनी ट्यूशनच्या ठिकाणी फोन केला असता तो ट्यूशनमध्ये पोहोचलाच नसल्याचे कळले. मग कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हाच संध्याकाळी 5 वाजल्यापासून लिफ्ट बंद असल्याची माहिती समोर आली. मुलगा लिफ्टमध्ये अडकून पडला असावा असा संशय आल्याने त्यांनी लिफ्ट पुन्हा सुरू करवून घेतली. लिफ्ट सुरू होताच त्यातून मुलगा बाहेर पडला. लिफ्ट बंद झाल्यावर मदतीसाठी जोरजोरात हाक मारत होतो, इमर्जन्सी बटनही दाबले होते, परंतु कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. अशा स्थितीत स्वत:चे लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी होमवर्क करण्यास सुरुवात केल्याचे या मुलाने सांगितले आहे. परंतु या घटनेमुळे मुलाचे कुटुंबीय आणि सोसायटीतील अन्य लोक मात्र व्यवस्थापनावर नाराज झाले. 3 तासांपर्यंत लिफ्ट बंद राहूनही कुणीच दखल घेतली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.









