बेळगाव वनमध्ये गर्दी, लाभार्थ्यांची धडपड : उशिरा येणाऱ्या नागरिकांना परतावे लागतेय माघारी
बेळगाव : गॅरंटी योजनांच्या लाभासाठी आधारकार्ड दुरुस्तीला वेग आला आहे. त्यामुळे कर्नाटक वन, बेळगाव वन, ग्राम वन आणि बापूजी सेवा केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. काही केंद्रांवर मर्यादित नागरिकांनाच अर्ज देऊन दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे उशिराने येणाऱ्या नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. मागील महिनाभरापासून नागरिकांची दुरुस्तीसाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बेळगाव वन, कर्नाटक वनमध्ये गर्दी कायम आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य योजनेच्या अंमलबजावणीबरोबर गृहलक्ष्मीची अर्ज स्वीकृती सुरू आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड बंधनकारक आहेत. मात्र काही लाभार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर नाहीत. आधारकार्डमधील नावात बदल, पत्ता बदल व इतर दुरुस्तीची कामे आहेत. असे लाभार्थी बेळगाव वनमध्ये येऊन दुरुस्ती करू लागले आहेत. मागील पंधरा दिवसात आधारकार्ड दुरुस्तीसाठी मोठी कसरत करावी लागली होती. सकाळपासून लाभार्थ्यांना रांगेत थांबावे लागले होते. सध्यादेखील आधारकार्ड दुरुस्तीसाठी गर्दी कायम आहे. बेळगाव वन कार्यालयामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील आठ ठिकाणी नवीन स्मॉल बेळगाव वन सुरू करण्यात आली आहेत. खासबाग, टिळकवाडी, आलारवाड, उज्ज्वलनगर, बसवण कुडची, बॉक्साईट रोड, पिरनवाडी, वडगाव आदी ठिकाणी सेवा सुरू आहे. मात्र शहरातील रिसालदार गल्ली येथील बेळगाव वन कार्यालयात गर्दी वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढू लागला आहे. नागरिकांनी इतर ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
सर्व्हर डाऊनची समस्या
बेळगाव वन कार्यालयामध्ये सर्व्हर डाऊनची समस्या कायम आहे. त्यामुळे कामामध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. लाभार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. कधी सर्व्हर डाऊन समस्येमुळे माघारी परतावे लागत आहे. ऑनलाईन सेवा सुरळीत करावी, अशी मागणीही होत आहे.









