दैनंदिन कामकाजात अडथळा : घरोघरी मतदार गणती करण्यास प्रारंभ
बेळगाव : येत्या आठ महिन्यांत लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांवर मतदार गणतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सेविकांवर वाढलेल्या कामाच्या ताणामुळे दैनंदिन अंगणवाडीतील कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. आधीच समीक्षा सर्व्हेचे काम देण्यात आले आहे. त्यातच आता मतदार गणतीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने सेविकांची डोकेदुखी वाढली आहे. अंगणवाडी सेविकांवर घरोघरी जाऊन मतदार गणती करावी लागत आहे. दरम्यान, 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील युवकांची नोंद यासह इतर बाबींचीही नोंद करावी लागत आहे. यामध्ये अधिक वेळ जात आहे. त्यामुळे अंगणवाडीतील दैनंदिन काम कसे करावे, असा प्रश्नदेखील सेविकांसमोर पडला आहे. जिल्ह्यात 50331 अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रामध्ये सेविका व मदतनीसांना गणतीच्या कामासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी सेविकांनी केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना संगोपन, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनाच्या नोंदी, गर्भवतींचा आहार, लसीकरण आदी कामे करावी लागतात. त्यातच आता गणती कामाची भर पडली आहे. त्यामुळे अंगणवाडीतील दैनंदिन कामात अडचणी वाढत आहेत. बालकांतील कुपोषिकता कमी व्हावी, यासाठी गतवर्षापासून सप्टेंबर महिन्यात पोषण आहार उपक्रम राबविला जात आहे. यंदाही हा उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे गणती आणि पोषण आहार व दैनंदिन अंगणवाडीचे कामकाज कसे पाहावे, या चिंतेत सेविका आहेत.
शासनाच्या आदेशानुसार कामाची जबाबदारी
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मतदार गणतीचे काम देण्यात आले आहे. शासनाकडून आलेल्या आदेशानुसार हे काम सोपविण्यात आले आहे. दैनंदिन अंगणवाडीच्या कामकाजाबरोबर मतदार गणती करावी लागणार आहे.
– रेवती होसमठ (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण खाते)









