वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 मानांकनात आपले अग्रस्थान कायम राखले आहे तर शुभमन गिलने 743 रेटिंग गुणांसह वनडे फलंदाजांच्या मानांकनात चौथे स्थान मिळविले आहे.
सूर्यकुमार आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळत नसला तरी त्याने टी-20 मानांकनातील पहिले स्थान कायम राखले आहे. या मानांकनासाठी भारत-आयर्लंड व यूएई-न्यूझीलंड यांच्यातील झालेल्या पहिल्या दोन सामन्यांचा विचार करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमनने आठ स्थानांची प्रगती करीत 24 व्या स्थानावर मजल मारली आहे. त्याने दोन सामन्यात 129 धावा जमविल्या. यूएईचा वृत्त्या आनंदने पाच स्थानांची प्रगती करीत 56 वे स्थान घेतले आहे.
वनडे मानांकनात बाबर आझम 880 गुणांसह आघाडीवर असून द.आफ्रिकेचा रासी व्हान डर डुसेन (777) दुसऱ्या, इमाम उल हक (752) तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताच्या ऋतुराज गायकवाडने तब्बल 143 स्थानांची प्रगती करीत 87 व्या स्थानावर झेप घेतली आहे. आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक नोंदवले होते.वनडे गोलंदाजांत हॅझलवुड 705 गुणांसह पहिल्या, मिचेल स्टार्क 686 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.









