सुवर्णविजेता हनी दबस , रौप्य विजेता राहुल जोगराजिया
वृत्तसंस्था/ दुबई
धैर्य, दृढनिश्चय व ताकदीचे आश्चर्यकारक प्रदर्शन करीत भारतीय खेळाडूंनी येथे सुरू झालेल्या वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या दिवशी सुवर्णासह दोन पदके पटकावत ऐतिहासिक यश मिळविले.
हनी दबसने जबरदस्त कामगिरी करीत उपस्थितांनाही चकित केले. त्याने 132, 135 किलो वजन उचलून दाखवले. मात्र एका प्रयत्नात त्याच्याकडून फाऊल झाले. 72 किलो कनिष्ठांच्या गटात राहुल जोगराजियाने चुरशीच्या लढतीत रौप्यपदक पटकावले. त्याने 128 व 132 किलो वजन उचलले. त्याच्याकडूनही एका प्रयत्नात फाऊल झाले. भारताचे एकूण 21 अॅथलीट्स या स्पर्धेत सहभागी झाले असून नऊ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताला भरघोस यश मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.
प्रमुख प्रशिक्षक व भारतीय पॅरापॉवरलिफ्टिंगचे अध्यक्ष जेपी सिंग यांनी यशस्वी
खेळाडूंचे कौतुक केले. ‘भारतासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. ही ऐतिहासिक पदके मिळवून आपल्या खेळाडूंनी क्षमतेचा आणि जिद्दीचा पुरावाच सादर केला आहे. आपल्या क्रीडा क्षेत्रातील हा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. यापुढेही त्यांच्याकडून अशीच यशस्वी कामगिरी होत राहील, अशी अपेक्षा करूया,’ असे ते म्हणाले.
सुवर्णविजेत्या दबसनेही कृतज्ञता व्यक्त केली. ‘प्रमुख प्रशिक्षक जेपी सिंग यांनी यशाचा मार्ग दाखवून दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आमच्या क्षमतेवर व कौशल्यावर पूर्ण विश्वास दाखवत पाठिंबा देऊन अपंगत्वावर मात करण्याचा मार्ग दाखविला,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
भारतासाठी ही ऐतिहासिक पदके असून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मिळविलेली ही पहिलीच पदके आहेत. यापूर्वी 2021 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने एक कांस्यपदक मिळविले होते. यावेळी मात्र भारतीय खेळाडूंनी अपूर्व कामगिरी होण्याची अपेक्षा केली जात आहे.









