अमेरिका, चीन, रशियालाही नाही जमले, ते करुन दाखविले : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत प्रथम देश
► वृत्तसंस्था /बेंगळूर
साऱ्या भारताचेच नव्हे, तर जगाचे लक्ष खिळवून ठेवलेले भारताचे चांद्रयान-3 अभियान यशस्वी ठरले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने या अभियानाअंतर्गत पाठविलेल्या ‘विक्रम’ या अंतराळ वाहनाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करुन विश्वविक्रम साध्य केला आहे. बुधवारी संध्याकाळी पूर्वनिर्धारित समयानुसार 6 वाजून 4 मिनिटांनी विक्रमने सुयोग्यरित्या आणि सुरक्षितणे चंद्राच्या पृष्ठभागावर स्वत:ला स्थिर केले आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिखित व्हावा, असा इतिहास घडला. अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महाशक्तींनाही जे आजवर जमले नाही, ते भारताच्या महान शास्त्रज्ञांनी करुन दाखविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) या अभूतपूर्व यशासाठी संस्थेचे अभिनंदन केले असून पुढील अभियानांकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातून भारत आणि इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतात तर सर्वांनाच आनंदाचे भरते आल्याचे दिसत आहे.
भारताच्या या महत्वपूर्ण चांद्रअभियानाच्या सर्वात अवघड, जटील आणि अंतिम टप्प्याला बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साधारणत: साडेपाच वाजता प्रारंभ झाला. या कालावधीत सारा भारत चांद्रअभियानाला यश मिळो, अशी मनोमन प्रार्थना करीत होता. बेंगळूर येथील इस्रोच्या मुख्यालयात शास्त्रज्ञांच्या आणि सर्व उपस्थितांच्या मुखांवर यशाचा आत्मविश्वास आणि त्याचवेळी काहीसा तणावही दिसत होता. साधारणत: पावणेसहा वाजता विक्रम वाहनाने चंद्रावर उतरण्यास प्रारंभ केला. हे अंतर साधारणत: 23 किलोमीटरचे होते. हाच सर्वात निर्णायक आणि काहीसा धोकादायक समय होता. पण विक्रमने अंतिम क्षणांमधील ‘रफ ब्रेकिंग फेज, अल्टीट्यूड होल्डिंग फेज आणि फाईन ब्रेकिंग फेज हे तीन अतिमहत्वपूर्ण टप्पे अतिशय सहजगत्या आणि कोणताही अडथळा न होता, आधी निर्धारित केलेल्या कार्यक्रमानुसार पार केले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ते अलगद उतरले. असे अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग) अत्यंत कठीण असूनही इस्रोच्या कष्टपूर्वक केलेल्या प्रयत्नांने ते साध्य झाल्याने साऱ्या देशात आनंदाची लाट पसरली आहे. गेल्यावेळी या शेवटच्या टप्प्यातच यानाचा संपर्क तुटल्याने अभियान अयशस्वी झाले होते. तथापि, त्या अपयशातून धडा घेऊन इस्रोने यावेळी कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता प्रारंभापासूनच घेतली होती.

हा विकसित देशाचा शंखनाद
ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंतिम 25 मिनिटांमध्ये इस्रोचा हा पराक्रम पाहिला. अभियान यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. हे यश हा एका विकसित देशाचा शंखनाद आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या निमित्त त्यांनी देशवासियांना उद्देशून संदेशही दिला. भारताचे अवकाश अभियान केवळ चंद्रापुरतेच मर्यादित नाही. तर सूर्यही त्याचे लक्ष्य आहे. तसेच सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह शुक्रही इस्रोच्या टप्प्यात आहे. भारताला आता आकाश ठेंगणे आहे, असे भावोद्गार त्यांनी काढले.
चंदामामा दूर के नाही, टूर के…
भारताच्या या यशस्वी चांद्रअभियानामुळे चंद्रासंबंधीच्या बऱ्याच जुन्या संकल्पना मोडल्या जाणार आहेत. तसेच बऱ्याच पारंपरिक म्हणी आणि वाक्प्रचारही कालबाह्या ठरणार आहेत. आजवर हिंदी भाषेत लहान मुले ‘चंदामामा दूर के’ असे म्हणत होती. पण आता नव्या पिढीतील मुले ‘चंदामामा टूर के’ (चंद्रावर आपण जाऊ शकतो) असे म्हणतील, अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
असे झाले चंद्रावतरण….
14 जुलैला श्रीहरिकोटा येथून चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात येऊन अभियानाचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर उत्तरोत्तर या अभियानाच्या अंतिम ध्येयाच्या दिशेने प्रगती होत राहिली. मात्र, शेवटची 17 मिनिटे निर्णायक होती. ती सुरळीतपणे पार पडणे यशासाठी अत्यावश्यक होता. त्यांचा हा आढावा…
संध्याकाळी 5.45 वाजता रफ ब्रेकिंग फेज
या टप्प्यात विक्रम वाहन चंद्रापासून 750 किलोमीटर दूर होता. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने खाली येण्यास प्रारंभ केला. यावेळी त्याचा वेग 1.6 किलोमीटर प्रतिसेकंद होता. 690 सेकंदात विक्रमची चारही इंजिने कार्यरत झाली. त्यांनी वाहनाला वरच्या दिशेने ओढण्यास प्रारंभ केल्याने वाहनाचा वेग कमी झाला आणि ते चंद्राच्या पृष्ठभागावर आदळण्यापासून वाचले. परिणामी यश मिळाले.
संध्याकाळी 5.55 वाजता अल्टीट्यूड होल्डिंग फेज
या टप्प्यात विक्रमची स्थिती स्थैर्याकडे झुकणारी होती. या वाहनाकडून सातत्याने चंद्राची छायाचित्रे घेतली जात होतीं आणि पृष्ठभागाच्या स्थितीनुसार वाहन स्वत:चा तोल सांभाळत होते. ते त्याच्या चारही पायांवर उतरण्यासाठी योग्य स्थितीत आलेले होते. हा टप्पा चंद्रापासून 1,300 मीटर ते 800 मीटर इतक्या अंतराचा होता. या कालावधीत वाहनाचे सर्व सेन्सर्स कार्यरत झाल्याने त्याचा पृथ्वीवरील मुख्यालयाशी संपर्क योग्य रितीने होत राहिला होता.
संध्याकाळी 6 ते 6.03 वाजता फाईन ब्रेकिंग फेज
हा अंतिम आणि निर्णायक टप्पा 175 सेकंदांचा होता. या काळात वाहन चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर होते. त्याचा अवतरणाचा वेग 60 मीटर प्रतिसेकंद इतका मंद होता. वाहनाचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर रोखले गेले होते आणि ते उतरण्यासाठी सपाट जागा शोधत होते. ती जागा सापडताच वाहनाने काही क्षणातच चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला.
अंतिम 131 सेकंद टर्मिनल डिसेंट फेज (टचडाऊन)
या टप्प्यात विक्रम वाहन चंद्राच्या अगदी नजीक आले. त्यावर बसविलेला धोका ओळखणारा कॅमेरा सातत्याने कार्यरत होता. त्याला कोणताही धोका किंवा अडथळा न दिसल्याने पुढच्या 73 सेकंदांमध्ये वाहन चंद्रावर सुखरुप उतरले. काही धोका असताच तर वाहनाने तो 150 मीटर आधीच ओळखला असता आणि स्वत:ला थोडेसे सावरुन घेतले असते. पण परिस्थिती सुरळीत असल्याने हा टप्पाही सहजगत्या पार पडला आणि भारताच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला गेला.
अवतरणानंतर पुढे काय घडले…
ड उतरल्यानंतर काही काळ विक्रम आपल्या चारही आधारांवर स्थिर उभा होता. आसपास उडणारी धूळ खाली बसण्यासाठी त्याने प्रतीक्षा केली होती.
ड नंतर विक्रम वाहनाचा रँप उघडला आणि त्याच्या आतील ‘प्रग्यान’ हे प्रवासी उपकरण (रोव्हर) त्यातून त्याच्या चाकांवरुन घरंगळत बाहेर पडले.
ड यानंतर रात्री उशिरा विक्रम वाहनाने प्रग्यानची तर प्रग्यानने विक्रम वाहनाची छायाचित्रे काढून ती पृथ्वीवर पाठविण्यास प्रारंभ केले आहे.
ड विक्रमचे चंद्रावर अवतरण झाल्यापासून साधारणत: तीन वाजता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रग्यान हा रोव्हर त्याच्या कार्यासाठी सज्ज आहे.
‘प्रग्यान’चे नेमके कार्य काय…
ड या अभियानाचे अनेक लाभ होणार आहेत. चंद्राचा जवळून अभ्यास प्रग्यान करणार आहे. चंद्राच्या मातीचे शास्त्रीय परीक्षण, तेथील खडकांची रासायनिक संरचना, चंद्रावरील खनिजे, तेथे असणारा पाण्याचा अंश यांचे विश्लेषण करुन तो माहिती पाठविणार आहे. भविष्यकाळात चंद्राचा पृथ्वीला अधिकाधिक उपयोग कसा होईल, याची पायाभरणी करण्याचे कार्य त्याच्याकडून होणार आहे.
ड प्रग्यानला यापुढे 14 दिवस सूर्याचा भरपूर प्रकाश मिळणार असल्याने त्याला ऊर्जेचा पुरेसा पुरवठा होणार आहे. त्यामुळे तो ही सर्व कार्ये वेगाने करु शकणार आहे. त्याचे कार्यायुष्य 14 दिवसांचे असेल. पुढे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्याचा प्रकाश पुढचे दोन आठवडे पडणार नाही. त्यावेळी त्याचे कार्य थांबणार आहे.
ड या चौदा दिवसांमध्ये मिळालेली ही माहिती चंद्राच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. केवळ भारतालाच नव्हे, तर जगासाठीही ती मौलिक असेल. चंद्रावर उपयुक्त खनिजे आणि मूलद्रव्ये आहेत का, याचे संकेत या संशोधनातून मिळणार आहेत. यासाठीच अनेक देश चंद्रासाठी स्पर्धा करीत आहेत.









