अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले कौतुक : राजदुतांची माहिती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अलीकडच्या काळात भारत हा अमेरिकेसाठी जगातील सर्वात महत्त्वाचा देश बनला आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी बायडेन यांच्या या भूमिकेची माहिती दिली. अमेरिकेतील करदात्यांपैकी सहा टक्के भारतीय अमेरिकन आहेत. दोन्ही देशांमधील संबंध एकमेकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून 100 अविश्वसनीय दिवस पूर्ण करत असताना आपल्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध अधिक उंचावण्यास मी कटिबद्ध असल्याचेही गार्सेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या कारकिर्दीत 12 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या आहेत, 200 हून अधिक स्वादिष्ट भारतीय पदार्थ चाखले आहेत. मी माझ्या कार्यकाळात अमेरिका-भारत संबंध सुधारण्यासाठी उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. विविध देशांमधील परस्पर संबंधांमध्ये भारतीय डायस्पोरा महत्त्वाची भूमिका बजावतात. आता भारत जी-20 देशांचे अध्यक्षस्थान भूषवत असल्याची बाब आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये बायडेन यांचा भारत दौरा
सप्टेंबरमध्ये भारतात जी-20 शिखर परिषद आयोजित केली आहे. यात अनेक देशांचे नेते सहभागी होणार आहेत. तसेच जी-20 परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बायडेन 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर असतील, असे सांगण्यात आले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेव्रेटरी पॅरिन जीन-पियरे यांनीही जो बायडेन यांच्या भारत भेटीसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. जी-20 शिखर परिषदेदरम्यान ते इतर नेत्यांसोबत युव्रेन संघर्षासह अनेक जागतिक आव्हानांवर चर्चा करतील. यासोबतच जी-20 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक करतील.
जी-20 देशांच्या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, पॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन आदी देशांचा सहभाग असणार आहे. या सदस्य देशांचा जागतिक जीडीपीमध्ये सुमारे 85 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्क्मयांहून अधिक वाटा आहे. तसेच, या देशांमध्ये जगाच्या लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या आहे. अतिथी देशांमध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे जी-20 जागतिक नेत्यांची शिखर परिषद होणार आहे. ही शिखर परिषद भारतातील जागतिक नेत्यांच्या सर्वात मोठ्या संमेलनांपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी इंडोनेशियाकडून जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले होते.









