लंडनमधील डाटा व विश्लेषण कंपनी ग्लोबल डाटाच्या अहवालामधून माहिती
नवी दिल्ली
भारतामधील कार्ड पेमेंट 2023 मध्ये वार्षिक 28.6 टक्क्यांनी वाढून 27.9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज लंडनमधील डाटा आणि विश्लेषण क्षेत्रातील कंपनी ग्लोबल डाटाने आपल्या अहवालातून मांडला आहे.
यावेळी ग्लोबल डाटाने म्हटले आहे की, 2022 मध्ये भारतातील कार्ड पेमेंटचे मूल्य हे 26.2 टक्क्यांनी मजबूत होत वाढले असल्याची नोंद आहे. आर्थिक वाढ, इलेक्ट्रॉनिक पेमेंटसाठी ग्राहकांची वाढती पसंती आणि कॅशलेश पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून होणारे सततचे प्रयत्न यामुळे कार्डपेमेंटमध्ये वाढ झाल्याचेही म्हटले आहे.
…आता रोखीचा वापर कमीच : कार्तिक चल्ला
कार्तिक चल्ला, वरिष्ठ बँकिंग आणि पेमेंट्स विश्लेषक, ग्लोबलडाटा यांनी यावेळी म्हटले आहे की, ‘भारत ही परंपरागतपणे रोखीने चालणारी अर्थव्यवस्था आहे. परंतु कोणत्याही पेमेंटसाठी रोखीचा वापर आता कमी होत आहे. व्यापारी सेवा शुल्क कमी आणि पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्स उभारण्यासाठी व्यापाऱ्यांना सबसिडी देण्यासारखे सरकारी उपक्रम देशातील कार्ड पेमेंट मार्केट वाढण्यामागील महत्त्वाचे घटक आहेत’ असेही त्यांनी सांगितले आहे.
एटीएमकडील ओढा होतोय कमी
प्राप्त अहवालानुसार आता मागील काही वर्षांमध्ये पॉईट ऑफ सेल्स पेमेंटसाठी कार्डसच्या वापरामध्ये जोरदार वाढ झाली आहे. यामध्ये स्टोअर आणि ऑनलाईन दोन्हीमध्ये पीओएस टर्मिनलचा समावेश आहे. तसेच भारतीयांकडून एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचेही नमूद केले आहे.









