पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील 13जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबत संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सूचना दिल्या आहेत.
अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदूरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे व यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ही प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती मांढरे यांनी दिली. त्यांनी झेडपीच्या सीईओंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत शासन पत्र दि. 03.04.2023 अन्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परावनगी देण्यात आली आहे. अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने त्यांच्या पदभरतीबाबत शासनाने दिलेली परवानगी विचारात घेवून कार्यवाही करणे आवश्यक आहे.
शिक्षकांचा आता निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार
पवित्र प्रणाली मार्फत अनुसूचित जमाती पेसा मधील रिक्त पदे भरण्यासाठी अन्य पदभरतीबरोबर काही कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत असल्याने या कार्यालयाकडुन पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत अन्य पर्यायांचा विचार करणेबाबत शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय दि. 01.02.2023 मधील परिशिष्ट-क मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्याचे प्रमुख यानी कार्यवाही करण्याची तरतूद आहे, असे शिक्षण आयुक्त यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ही तरतूद लक्षात घेता आपणास TAIT 2022 चाचणी दिलेल्या ST-PESA उमेदवारांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता प्राप्त उमेदवाराचा आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करावी. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरती प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर निवडीचा पर्याय यापुढे खुला ठेवण्यात आल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.








