सेंटपॉल्स संघ उपविजेतेपद, अभिषेक सी. उत्कृष्ट खेळाडू : खैजर उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खाते मान्यताप्राप्त सेंटपॉल्स पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित पीयुसी चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिंगराज कॉलेजने सेंटपॉल्स कॉलेजचा 1-0 असा निसटता पराभव करून विजेतेपद पटकावले. अभिषेक सी. उत्कृष्ट खेळाडू तर खैजर याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. सेंटपॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आज सकाळी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात लिंगराज संघाने इस्लामियाचा 1-0 असा पराभव केला. लिंगराजतर्फे अभिषेक चिन्नाबाबू याने गोल केला. दुसऱ्या सामन्यात जीएसएस संघाने प्रेरणा कॉलेजचा 1-0 असा निसटता पराभव केला. जीएसएसतर्फे अर्जुन मेलगेने गोल केला. तिसऱ्या सामन्यात सेंटपॉल्सने भरतेचा ट्रायब्रेकरमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. शेवटच्या सामन्यात वागळे कॉलेजने गुड शेफर्ड कॉलेजचा 1-0 असा पराभव केला. वागळेतर्फे रोशन लिमाने गोल केला.
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लिंगराजने जीएसएस संघाचा ट्रायब्रेकरमध्ये 5-4 अशा गोलफरकाने तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटपॉल्सने वागळे संघाचा सडनडेथमध्ये 7-6 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात लिंगराज संघाने 16 व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. त्याचा फायदा उठवत रेहान किल्लेदारने गोलात रुपांतर करीत 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेंटपॉल्स संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रेव्हरंड फादर स्टीव्हन अल्मेडा, फादर सायमंड प्राचार्या डॉ. पद्मिनी, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे क्रीडा संयोजक एस. व्ही. हिरेमठ आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या लिंगराज व उपविजेत्या सेंटपॉल्स संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अभिषेक चिन्नाबाबू, उत्कृष्ट गोलरक्षक खैजर, उगवता फुटबॉलपटू आदित्य (सेंटपॉल्स), शिस्तबद्ध संघ वागळे कॉलेज यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, कौशिक पाटील व सुदर्शन चौगुले यांनी काम पाहिले.









