बीडीएफए आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा : 19 संघांचा सहभाग : प्रकाश झोतात सामन
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित प्रकाश झोतातील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी केव्ही-2, कॅन्टेमेंट, जैन हेरीटेज, सेंटपॉल्स संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. लव्ह डेल स्कूलच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या बीडीएफए आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, पॅट्रान राम हदगल, उपाध्यक्ष लेस्टर डिसोझा, सचिव अमित पाटील, एस. एस. नरगोडी. व्हिक्टर परेरा, अल्लाबक्ष बेपारी आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्याहस्ते चेंडू किक मारून व संघाची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात केव्ही-2 मुक्तांगण शाळेचा 1-0 असा पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला केव्ही-2 च्या रोहित बी. ने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. हिच आघाडी विजयला कारणीभूत ठरली.
दुसऱ्या सामन्यात कॅन्टोमेंटने अंगडी शाळेच्या 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला इसा सराफने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला अमिन शेखने दुसरा गोल केला. तर 33 व्या मिनिटाला इसा सराफने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात जैन हेरीटेजने बेन्सन शाळेचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 18 व 11 व्या मिनिटाला अर्थव सावंतने सलग 2 गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला प्रथम पत्तारने तिसरा गोल केला. तर 40 व्या मिनिटाला अर्पित परमशेट्टीने चौथा गोल केला. शेवटच्या सामन्यात सेंटपॉल्सने जीवन ज्योती संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात 7, 17 व 23 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या जोशवा वाझने सलग तीन गोल करीत स्पर्धेची पहिली हॅट्ट्रीक नोंदविली. दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनिटाला शनन कोलकारने चौथा तर 35 व्या मिनिटाला अमानउल्ला आसेखानने पाचवा गोल केला.









