पिंपरी / प्रतिनिधी :
पुण्यात दहशतवाद्यांची मोठी साखळी उघड झाली आहे. सर्वांना हादरा बसेल अशी ही साखळी आहे. याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे कुठे चालले आहेत हे जाहीरपणे व्यक्त करण्यास मला मर्यादा आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षांचा मागोवा व वाटचाल या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन आणि राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्री पाटील बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पोलिसांनी पुण्यात दोन दहशतवाद्यांना पकडले. यानंतर ही साखळी उघड झाली. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत आहेत. पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कठीण गुन्हे उघडकीस आणत आहेत. पोलीस कोणत्याही गुन्ह्याचा शोध २४ तासात लावू शकतात. पोलिसांकडे अशी एक यंत्रणा आहे, की एखाद्याने मोबाईल बंद करून ठेवला तरी तो कुठे आहे, हे ते शोधू शकतात.
पोलिसांना चांगले म्हणणे, त्यांचा सत्कार करणे हे फार कमी होते. पोलिसांचा सत्कार करून त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तेही माणूसच आहेत. त्यांची स्तुती केली पाहिजे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल, असे सांगत पुणे शहरात १०० पोलीस चौक्या आहेत. त्या भिकार अवस्थेत असून, पंखे खडखड करत असतात. पुणे, पिंपरी – चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी लोक सहभागातून ६० आणि जिल्हा नियोजन समितीतून ४० असा १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.








