तलावांना वीर सैनिकांची नावे : केंद्र सरकारच्या पोर्टलवर माहिती वर्ग
बेळगाव : अमृतसरोवर योजनेंतर्गत जिह्यामध्ये निर्माण करण्यात आलेल्या सरोवरांवर यंदा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. काम पूर्ण झालेल्या जिह्यातील 140 तलावांवर ध्वजारोहण करण्यात आले. सदर माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली, अशी माहिती जिल्हा पंचायत योजना अधिकारी बसवराज यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून रोजगार हमी योजनेंतर्गत अमृतसरोवर योजना राबविण्यात आली आहे. सरकारच्या विकास कामांची माहिती नागरिकांना मिळावी, विकास कामांसाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता व्हावी, या उद्देशाने यंदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी काम पूर्ण झालेल्या अमृतसरोवर तलावांवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभारून ध्वजारोहण करण्यात आले.
जिह्यामध्ये अमृतसरोवरांचे काम पूर्ण झालेल्या तलावांवर ध्वजारोहण करण्याची सूचना संबंधित ग्रामपंचायतींना करण्यात आली होती. त्यानुसार जिह्यातील 98 ग्रामपंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या 140 अमृतसरोवर तलावांवर यशस्वीरीत्या ध्वजारोहण करण्यात आले. यासाठी मार्गसूची जारी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतींकडून आवश्यक ती तयारी करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमाचे फोटो व माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आली होती. अमृतसरोवर तलावांवर ध्वजारोहण झालेल्या कार्यक्रमाची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सूचना करण्यात आली होती. सदर माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर लिंक करून त्याप्रमाणे माहिती पुरविण्यात आली आहे. सूचना केल्याप्रमाणे जिह्यातील काम पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींकडून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला, असे योजना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भविष्यामध्ये अमृतसरोवर तलावांवरील उर्वरित कामे वेळेत पूर्ण करून उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









