जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेळगाव : रुक्मिणीनगर येथील कोंचीकोरव कॉलनीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले असले तरी दखल घेण्यात आली नाही. यामुळे कॉलनीमध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. मूलभूत सुविधांची त्वरित पूर्तता करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन डॉ. बी. आर. आंबेडकर कोंचीकोरव संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कोंचीकोरव कॉलनीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले. या भागामध्ये मागासवर्गीय समाजातील नागरिक वास्तव्याला आहेत. रस्ते, पथदीप, पिण्याचे पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, गटारी आदी सुविधा नसल्याने येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गैरसोयीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पथदीप नसल्याकारणाने रात्रीच्यावेळी ये-जा करणे कठीण झाले आहे. तर गटारी, ड्रेनेज नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेअभावी रोगराई वाढली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. मागणी करूनही विकासकामे व सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









