वृत्तसंस्था/ कोपनहेगन (डेन्मार्क)
येथे सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू एचएस प्रणॉय व लक्ष्य सेन यांनी शानदार विजयी सलामी दिली. मिश्र दुहेरी प्रकारात मात्र भारताच्या रोहन कपूर व एन सिक्की रे•ाr यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
सोमवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या प्रणॉयने फिनलँडच्या कॅले कोनोजनचा 24-22, 21-10 असा पराभव केला. 37 मिनिटे चाललेल्या या लढतीत प्रणॉयने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. प्रतिस्पर्धी कॅलेने पहिल्या गेममध्ये प्रणॉयला चांगलीच टक्कर दिली. पण अनुभवी प्रणॉयने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पहिला गेम जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने कॅलेला जराही संधी न देता हा गेम 21-10 असा सहज जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता, दुसऱ्या फेरीत त्याची लढत इंडोनेशियाच्या चिको वार्डियोशी होईल.
अन्य एका सामन्यात लक्ष्य सेनने विजयी प्रारंभ करताना मलेशियाच्या जॉर्ज पॉलचा 21-12, 21-7 असा धुव्वा उडवला. ही लढत 25 मिनिटे चालली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात लक्ष्यने सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व ठेवले. आता, दुसऱ्या फेरीत त्याचा सामना कोरियाच्या जेओन हेयॉकशी होईल.
मिश्र दुहेरीत रोहन कपूर-एन सिक्की रे•ाr पराभूत
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन कपूर-एन सिक्की रे•ाr जोडीला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. स्कॉटलंडच्या अॅडम हॉल व ज्युली मॅकपर्सन जोडीने भारतीय जोडीचा 21-14, 20-22, 21-18 असा पराभवाचा धक्का दिला. 64 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीकडून अनेक चुका झाल्या, याचा फटका त्यांना बसला.









