वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिणेतील अभिनेता प्रकाश राज याने भारताच्या चांद्रयान अभियानाची खिल्ली उडविणारी पोस्ट प्रसारित केल्याने त्याच्यावर सोशल मिडियावरुन टीकेचा भडिमार होत आहे. या अभियानाची चेष्टा करणारे एक व्यंगचित्र त्याने आताच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरुन प्रसारित केले होते. त्यात या अभियानाला नकारात्मक पद्धतीने चित्रित करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून त्याच्यावर अनेक खोचक टिप्पण्या करण्यात येत आहेत.
चांद्रयान अभियानाची चेष्टा उडवून त्याने केवळ काही व्यक्तींचाच नव्हे, तर साऱ्या देशाचा अपमान केला आहे. प्रकाश राजसारख्या प्रसिद्ध व्यक्तीने अशी भूमिका घ्यावी हे निंदाजनक आणि दु:खद आहे, अशी टिप्पणी त्याच्या अनेक चाहत्यांनीही केली आहे. इस्रोसारख्या एका जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित संस्थेने आजवर अनेक अभियाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. अशा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांची अशी चेष्टा करणे हे संकुचित बुद्धीचे लक्षण असल्याचेही अनेक नागरिकांनी सोशल मिडियावर म्हटले आहे. हे अभियान कोणत्याही पक्षाचे नाही तर इस्रोचे आहे. ते यशस्वी झाल्यास त्याचे श्रेय कोणत्या राजकीय पक्षाला नव्हे, तर संपूर्ण भारताला मिळणार आहे. त्यामुळे आपला पक्षीय दु:स्वास आणि राजकीय द्वेष बाजूला ठेवून या अभियानाकडे पहावयास हवे असा सल्लाही त्याला अनेकांनी दिला आहे.









