वृत्तसंस्था / पाटणा
आपल्या कन्येचा मृत्यू झाला आहे अशा समजुतीत असणाऱ्या आणि अन्य कोणत्या तरी मृतदेहावर, तो आपल्या कन्येचा असल्याचे समजून अंत्यसंस्कार केलेल्या आणि दु:खात बुडालेल्या पित्याला प्रत्यक्ष त्यांच्या कन्येकडूनच ती जिवंत असल्याचा संदेश मिळाल्याची घटना घडली आहे. या विलक्षण घटनेची चर्चा आता सर्वत्र होत असून पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील अकबरपूर येथील रहिवासी अंशू कुमारी हिच्या संबंधी घडलेली ही घटना आहे. ती गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता होती. तिच्या वडिलांनी आणि अन्य कुटुंबियांनी तिला शोधण्याचा बराच प्रयत्न केला. पोलिसांनीही त्यांच्या परीने प्रयत्न केला. तथापि, ती सापडली नसल्याने तिच्या जिवंत असण्याची आशा तिच्या पित्याने सोडली होती. काही दिवसांनंतर पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह सापडला. तो आपल्याच कन्येचा आहे असे समजून पित्याने आणि कुटुंबियांनी त्या मृतदेहावर जड अंत:करणाने अंत्यसंस्कारही केले.
तथापि, काही दिवसांपूर्वी पित्याला प्रत्यक्ष कन्येनेच व्हिडीओ संदेश मोबाईलवर पाठविला. आपण जिवंत असल्याचे तिने स्पष्ट केले. त्यामुळे पित्याला आणि कुटुंबियांना आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. आपण आपल्या प्रियकराबरोबर पाळून जाऊन विवाह केला आहे, अशीही माहिती तिने दिली. आपल्या विवाहाला विरोध होईल या भीतीपोटी तिने आपली माहिती दिली नव्हती. पण तिच्या ‘अंत्यसंस्कारा’चे वृत्त पसरल्यानंतर तिने आपण जिवंत असल्याचे स्पष्ट केले.
ज्या तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिचा शोध घेण्यात आला असता तिचीही ओळख नंतर स्पष्ट झाली. तिचा मृत्यू हा ‘ऑनर किलिंग’ असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तिच्या पित्याच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली असता ते सर्व कुटुंब बेपत्ता असल्याचे दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे. अंशू कुमारी जिवंत असल्याची पडताळणी करण्यात आली आहे.









