बुधवारी संध्याकाळी चंद्रावर अवतरण शक्य, आली चंद्रघटिका समीप
वृत्तसंस्था / बेंगळूर
येत्या बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साधारण 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज असलेल्या चांद्रयान-3 च्या ‘विक्रम’ या अवतरण वाहनाने (लँडर) चंद्राच्या अंधाऱ्या भागाची छायाचित्रे पाठविल्याने तो औत्सुक्याचा विषय बनला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या चंद्राच्या भागाचे दर्शन त्यातून होत आहे.
या चांद्रयान अभियानाने आतापर्यंत तीन महत्त्वाचे टप्पे सुरळीतरित्या पार केले असून आता अंतिम, सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जटील टप्पा पार करण्याचे कार्य राहिले आहे. सर्व परिस्थिती अनुकूल असल्यास येत्या बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पावणेसहा ते सव्वासहा वाजण्याच्या वेळेस हे विक्रम वाहन चंद्रावर उतरणार आहे. तांत्रिक भाषेत याला ‘सॉफ्ट लँडिंग’ असे संबोधले जाते. ते यशस्वी झाल्यास भारत हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश होणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी हे कार्य साध्य केले आहे.

विक्रम वाहन चंद्रावर नेमके कोणत्या स्थळी उतरणार याची निश्चिती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी साधारणत: पावणेसहा वाजता विक्रम चंद्राच्या अगदी जवळ पोहचणार असून तेथून यांत्रिक बलाच्या साहाय्याने त्याचे चंद्रावर अवतरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याला पॉवर्ड लँडिंग असे म्हणतात. संपूर्ण चांद्रयान-3 या अभियानातील हा अर्धा तास सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक असेल. हे अवतरण सुरळीत आणि सुरक्षित व्हावे यासाठी अनेक अतिरिक्त साधने साहाय्यभूत ठरणार असून संस्थेच्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांकडून शक्य ती सर्व दक्षता घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘प्रग्यान’ चंद्रावर प्रवास करणार
सर्व तांत्रिक बाबी सुरळीत पार पडल्यास विक्रम हे वाहन हळूवारपणे चंद्रावर उतरणार आहे. त्यानंतर काही वेळातच या वाहनातून ‘प्रग्यान’ हे प्रवासी उपकरण (रोव्हर) त्यातून बाहेर पडणार असून ते चंद्राच्या पृष्ठभागावर काही अंतर प्रवास करेल. या काळात ते चंद्राच्या पृष्ठभागाची जवळून छायाचित्रे पाठविणार आहे. तसेच माती व खडकांचे विश्लेषणही करणार आहे. यातून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या भागाची अधिक माहिती उपलब्ध होईल अशी शक्यता आहे.
अतिरिक्त कालावधीचीही सोय
बुधवारी सायंकाळी साधारण सहा वाजता सूर्य मावळल्यावर चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातही अंधार होणार आहे. त्यामुळे विक्रम वाहनाला सूर्याची ऊर्जा मिळणार नाही आणि ते स्तब्ध होईल. त्यानंतर ते हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने खाली येऊ लागेल. हा टप्पा सर्वात निर्णायक आहे. ते सावकाश उतरले तर सुरक्षितरित्या त्याचे अवतरण होऊन अभियान यशस्वी होणार आहे. मात्र, या वाहनाला अतिरिक्त ‘आयुष्य’ मिळावे अशीही सोय करण्यात आली आहे. अवतरणाच्या निर्धारित काळाच्या 12 तासांनंतरही त्याला पुन्हा सौरऊर्जेची प्राप्ती होऊन ते कार्यरत होऊ शकते. अशी दुहेरी सुरक्षितता त्याला प्रदान करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली आहे.
निर्णायक क्षण येतोय समीप…
ड बुधवारी सायंकाळी पावणेसहा ते सव्वासहा हा अर्धा तास निर्णायक
ड याच काळात विक्रम वाहनाचे ‘प्रग्यान’सह चंद्रपृष्ठावर अवतरण शक्य
ड विक्रम वाहनाला अतिरिक्त ‘आयुष्य’ मिळण्याची सोयही उपलब्ध









