वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काही अमेरिकन उत्पादने विशेषकरून प्रतिष्ठित हार्ले-डेव्हिडसन दुचाकींवर भारताकडून आकारण्यात येणाऱ्या अत्याधिक कराचा मुद्दा उपस्थित केला आहे. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यावर भारतीय उत्पादनांवर अधिक कर लादणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी स्वत:च्या अध्यक्षकाळात भारताला ‘टेरिफ किंग’ ठरविले होते. मे 2019 मध्ये त्यांनी भारतासाठीची जीएसपी व्यवस्था समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने अमेरिकेच्या उत्पादनांना स्वत:च्या बाजारपेठेपर्यंत पोहोचू दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
एक समान कर असावेत अशी माझी आहे. भारतात आयातशुल्क अत्यंत अधिक आहेत. तेथे 100 टक्के, 150 टक्के आणि 200 टक्के कर आकारला जातो. स्वत:च्या देशात निर्मित दुचाकींची विक्री अधिक व्हावी म्हणून भारत अशाप्रकारचे पाऊल उचलतो. भारत स्वत:च्या देशात निर्मित दुचाकी अमेरिकेत कुठल्याही कराशिवाय विकू शकतो. परंतु जेव्हा हार्ले डेव्हिडसन स्वत:ची बाइक भारतात विकू पाहते तेव्हा तेथे त्यावर कराचा बोझा टाकला जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
ब्राझीलमध्येही आयातशुल्काचे प्रमाण अत्यंत अधिक आहे. भारत आमच्याकडून 200 टक्के आयातशुल्क आकारत असल्यास आणि आम्ही त्यांच्या उत्पादनासाठी कुठलेच शुल्क आकारू शकत नाही. कारण मुक्त व्यापाराच्या नावाखाली अमेरिका भारताला ही सूट देत आहे. परंतु आम्ही त्यांच्याकडून 100 टक्के शुल्क निश्चितच आकारू शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.









