सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची मोठी झेप :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान ‘नारी शक्ती’चे कौतुक केले आहे. महिलांनी अनेक अडथळे पार करत क्षेपणास्त्रांपासून संगीतापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये कामगिरीचे उच्चांक गाठल्याचे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत. माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित आर्मी वाइव्स वेलफेयर असोसिएशनकडून आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपतींनी भाग घेतला अहे. सर्व वीर नारींचे त्यांच्या योगदानासाठी आभार मानते असे मुर्मू यांनी म्हटले आहे. कार्यक्रमादरम्यान एका सैनिकाशी विवाह करणाऱ्या झारखंडच्या एका शिक्षिकेने स्वत:च्या जीवनातील अनुभव सांगितले. स्वत:चा दृढसंकल्प आणि लवचिकतेच्या भावनेच्या मदतीने अडथळ्यांवर विजय प्राप्त केल्याचे या महिलेने सांगितले आहे.
या कार्यक्रमात भाग घेण्यापूर्वी मुर्मू यांनी असोसिएशनकडून आयोजित प्रदर्शनाची पाहणी केली आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी सुदेश धनखड आणि विदेश तसेच संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी भाग घेतला आहे.









