अध्याय अठ्ठावीसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, माणसाला एखाद्या गोष्टीचा नाद लागला की त्यापुढे त्याला इतर काहीही सुचत नाही. एव्हढेच काय तसे करण्यामध्ये काही अडचणी येऊ लागल्या की, त्याचा नाईलाज होतो. त्यामुळे त्याचा क्रोध अनावर होतो. पण इतर गोष्टींच्या नादाची बाब वेगळी आणि माझ्या ध्यानाच्या नादाची गोष्ट वेगळी. कारण माझे ध्यान करण्याचा नाद लागला की, माझ्या नामाच्या महतीपुढे नाम घेण्यात येणाऱ्या अडचणींना थारा मिळत नाही.
सर्व विघ्नांचा नाश झाल्याने मनात विकल्प म्हणून रहात नाहीत. उद्धवाने भगवंतांचे सर्व बोलणे मन लाऊन ऐकले. भगवंतांचे मनोभावे ध्यान केल्याने सर्व विघ्ने दूर पळून जातील ह्याची त्यालाही खात्री वाटत होती परंतु माणसाचे मन अतिशय चंचल असल्याने ते एका जागी स्थिर करणे हे कर्मकठीण काम आहे हे तो जाणून होता. त्याच्या मनातला प्रश्न ओळखून भगवंत म्हणाले, एका जागी आसन घालून मनाला एकाग्र करून माझ्यावर लक्ष केंद्रित केल्यावर विघ्ने बाधत नाहीत हे खरेच आहे परंतु ही सोपी गोष्ट नाही हे पटण्यासारखेच आहे म्हणून मी तुला गीतेत अर्जुनाला सांगितला त्यापेक्षा वेगळा उपाय सांगतो. तो ऐक, जर भक्ताने माझे नामसंकीर्तन मनापासून केले तर हरिनामामुळेसुद्धा विघ्नांचा सर्वनाश होतो.
जेथ नामाची गर्जना होत असते तेथे कोणताही उपसर्ग येऊ शकत नाही. महाविघ्नांचा कडकडाट तेथे भुईसपाट होतो. माझी अखंड नामकीर्ती ज्याच्या मुखात वसत असते तेथून विघ्ने पोबारा करतात आणि अडचणींना चिरशांती मिळते. माझ्या नामाच्या नित्य गजराने महापापांचा संभार नष्ट होतो. सहज म्हणून जरी माझे नाम मुखात आले तर सर्व पापांचे भस्म होते मग जिथे अखंड माझ्या नामाचा गजर होत असेल तेथे विघ्ने तर येत नाहीतच पण भविष्यात काही विघ्न येईल की काय अशी शंकासुद्धा येत नाही.
ज्याप्रमाणे सुर्यापूढे अंधार येणे शक्य नाही त्याप्रमाणे जेथे माझ्या नाम कीर्तनाचे पोवाडे अखंड गायले जात असतील तेथे विघ्ने येणे शक्य नाही. ज्याप्रमाणे दिव्याच्या ज्योतीपुढे पतंगाचे काही चालत नाही, त्याप्रमाणे माझ्या नामसंकीर्तनापुढे महाविघ्नांचे तळपट होते. एकूण काय तर अखंड नामसंकीर्तन करावे आणि निश्चिंत व्हावे ह्या माझ्या वचनावर विश्वास ठेव.
इथेही पुन्हा उद्धवाच्या मनात प्रश्न डोकावू लागला की, एखाद्याला सतत नामसंकीर्तन करावेसे वाटण्यासाठी त्याला काय करावे लागेल? उद्धवाच्या मनात असा प्रश्न येण्याचे कारण म्हणजे, जरी भगवंतांनी सांगितलेले भक्ताला पूर्णपणे पटलेले असले आणि त्यानुसार सतत नामस्मरण करावे अशी त्याची तीव्र इच्छा असली तरी समोर दिसणाऱ्या प्रपंचाची त्याला इतकी ओढ असते की, ती ओढ त्याच्या नामस्मरण करण्याच्या तीव्र इच्छेवर मात करते. भगवंतांनाही ही कल्पना होतीच! म्हणून आपल्या लाडक्या भक्ताने नाम घेण्याच्या इच्छेला बाजूला सारू नये ह्या हेतूने ते म्हणाले, माझी सेवा करण्याच्या उद्देशाने ज्याला मुखात सतत नाम यावे असे वाटत असेल त्याने साधुसेवा करावी. साधुसेवा म्हणजे त्यांच्या शरीराची सेवा नव्हे तर त्यांच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करावे. असे करत गेल्यास तेथे विघ्नांना थारा मिळत नाही.
जो संत सेवा करतो त्याला आपण कोण आहोत आणि सध्याची आपली स्थिती तात्पुरती असून मायिक आहे हे लक्षात येते आणि त्यामुळे त्याला समोर दिसणाऱ्या संसाराची वाटणारी अनिवार ओढ नाहीशी होते. त्यामुळे माझ्या नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही विचार त्याच्या मनात येत नाहीत. माणसाला ज्या गोष्टीची आवड नसते त्याबद्दल त्याच्या मनात कधीच विचार येत नाहीत तसेच येथे घडते. संसाराची ओढ नाहीशी झाल्याने त्याबद्दलचे विचार त्याच्या मनात येणे बंद होते. ह्याप्रमाणे संत जेव्हा साधकांचा पाठीराखा होऊन त्याचा मित्र होतो तेव्हा महाविघ्ने तोंड काळे करतात.
क्रमश:








