प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : सत्ताधारी मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर तीन दिवसांतच कोल्हापूर महापालिकेसाठी आयुक्त नियुक्ती होईल, अशी ग्वाही देतात. तीन दिवसांचे आठ दिवस झाले तरी महापालिकेला आयुक्त काही मिळत नाही. विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलन, मोर्चा काढले. नुसतीच आश्वासन दिली जात आहेत.
महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची 2 जुन रोजी पुण्याला बदली झाली आहे. यानंतर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्तपद रिक्त आहे. शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पार्टी यांनी आयुक्त नियुक्त करण्यासाठी आंदोलन केले. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी आवाज उठवला. तरीही आयुक्त नियुक्त झालेली नाही.
पालकमंत्री दीपक केसरकर पूरपरिस्थती पाहणीसाठी 24 जुलै रोजी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना तीन दिवसांत कोल्हापूरला आयुक्त मिळेल, अशी ग्वाही दिली होती. यास महिना होत आला तरी आयुक्त काही मिळालेले नाहीत. 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटून तीन दिवसांत आयुक्त नियुक्ती करू, असे आश्वासन दिले होते. यालाही आठ दिवस होत आले तरी शासकीय पातळीवर आयुक्त नियुक्तीचे घोंगडे भिजतच आहे.
आयुक्त नियुक्ती संशयाच्या भोवऱ्यात
तीन महिने होत आले तरी कोल्हापूर महापालिकेला आयुक्त नियुक्ती झालेली नाही. महायुतीमधील कोल्हापुरातील काही नेत्यांचा हस्ताक्षेपामुळे नियुक्त झाली नसल्याची चर्चा आहे. तर डील होत नसल्यामुळेही नियुक्ती रखडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यामुळे मनपा आयुक्त नियुक्त संशयाच्या भोवऱ्यात आहे.









