मेहुली घोषला पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अझरबेजानमधील बाकू येथे नुकत्याच झालेल्या आयएसएसएफच्या विश्व चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज मेहुली घोषने महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात कास्यपदक मिळवून पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारातील पात्र फेरीमध्ये मेहुली घोषने आघाडीचे स्थान मिळवले होते. त्यानंतर झालेल्या 8 स्पर्धकांच्या अंतिम फेरीत मेहुली घोषने 229.8 गुणासह कास्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात चीनच्या हेन जियायुने 251.4 गुणासह सुवर्णपदक तर वेंग झिलीनने 250.2 गुण नोंदवत रौप्यपदक मिळवले.
या स्पर्धेमध्ये मेहुली घोषने महिलांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात तिलोत्तमा आणि रमिता यांच्या समवेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारताने या क्रीडा प्रकारात 1895.9 गुणासह सुवर्ण, चीनने 1893.7 गुणासह रौप्य तर जर्मनीने कास्यपदक पटकावले.