अवकाशयान चंद्रावर कोसळल्याची ‘रोसकोसमॉस’ची माहिती
वृत्तसंस्था/ मॉस्को
तब्बल 47 वर्षांनंतर चंद्राच्या दिशेने पाठवलेली ‘लुना-25’ मोहीम अयशस्वी ठरल्याने रशियाचा हिरमोड झाला आहे. ‘लुना-25’ यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्यामुळे चांद्रमोहीम असफल ठरली आहे. रशियाने शुक्रवार, 11 ऑगस्ट रोजी चांद्रमोहीम ‘लुना-25’चे प्रक्षेपण केले होते. हे अवकाशयान 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवतरणाला एक-दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना यान दुर्घटनाग्रस्त झाल्याने रशियाची चांद्रमोहीम फसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. लुना-25 हे अंतराळयान अभिप्रेत कक्षेऐवजी अनियंत्रित कक्षेत गेल्यानंतर चंद्रावर आदळल्याची माहिती रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकोसमॉस’ने जारी केली आहे.
भारताच्या चांद्रयान-3 सोबतच रशियाही चंद्रावर उतरण्याच्या तयारीत होते. रशियाने 11 ऑगस्ट रोजी ‘मिशन लुना-25’चे प्रक्षेपण यशस्वीपणे केले होते. यापूर्वी 1976 मध्ये त्यांनी ‘मिशन लुना-24’ चंद्रावर उतरवले होते. भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. भारताचे हे अवकाशयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. पण, त्यापूर्वी रशियाचे लुना-25 चंद्रावर उतरेल अशी अपेक्षा होती. मात्र, लुना-25 चंद्राच्या पृष्ठभागावर धडकल्यामुळे रशियाचे स्वप्न अधुरे राहिले..
रशियाने व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून लुना-25चे प्रक्षेपण पेले होते. लुना-25 पाच दिवसात चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. त्यानंतर ते 7 ते 10 दिवस चंद्राच्या कक्षेत राहिल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झाले. तरीही लुना-25 च्या लँडरवरील पॅमेऱ्यांनी पृथ्वीपासून चंद्राचे दूरवरचे फोटो आधीच घेतले होते. लुना-25 हे यान सोयुझ 2.1बी रॉकेटमधून चंद्रावर पाठवण्यात आले. त्याला लुना-ग्लोब मिशन असे नाव देण्यात आले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले वाहन उतरवण्याची रशियाची योजना होती. चंद्राच्या या ध्रुवावर पाणी सापडण्याची शक्मयता गृहीत धरून ते खडक आणि मातीचे नमुने गोळा करणार होते. भविष्यात मानवाने चंद्रावर तळ तयार केल्यास तेथे पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, हा रशियाचा उद्देश होता.









