वृत्तसंस्था/ मेरीलँड
अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये एक भारतीय वंशाचे दांपत्य तसेच त्यांचा 6 वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांना आत्महत्या-हत्येचा संशय आहे. हे कुटुंब मूळचे कर्नाटकातील दावणेगिरी येथील होते असे समजते. बाल्टीमोर काउंटीतील घरात ते मृत आढळून आले असून त्यांचा मृत्यू बंदुकीच्या गोळीमुळे झाल्याचे समजते.
योगेश होन्नाळ (37 वर्षे), प्रतिभा होन्नाळ (37 वर्षे) आणि यश होन्नाल (6 वर्षे) अशी या मृतांची नावे आहेत. योगेश अन् प्रतिभा हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होते. प्रतिभा अन् यश यांची हत्या केल्यावर योगेशने आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी प्रारंभिक तपासाच्या आधारावर वर्तविला आहे. बाल्टीमोर पोलिसांकडून होन्नाळ यांच्या भारतातील कुटुंबीयांना घटनेची कल्पना देण्यात आली आहे.
संबंधित कुटुंबाला यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी पाहिले गेले होते. या तिघांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाकडून उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.









