वाळपई प्रतिनिधी
गोमंतकातील ज्येष्ठ कीर्तनकार व हरिभक्त पारायण या संस्थेचे संस्थापक व सल्लागार कीर्तनकार नारायणबुवा बर्वे यांचे बांबर सत्तरी येथील राहत्या घरी शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. गोव्यात कीर्तन परंपरा ऊजवावी व त्याचे विस्तारीकरण व्हावे यासाठी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी गोव्यासह सिंधुदुर्गातही हजारो कीर्तन कार्यक्रम केले. कीर्तनाद्वारे समाज जागृती करण्यात नारायणबुवा बर्वे यांचे महत्त्वाचे योगदान होते. नारायणबुवा बर्वे हे लहानपणीच कीर्तनाच्या सानिध्यात आले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपली वेगळी अशी प्रतिमा निर्माण केली होती. चक्री कीर्तनाचा नवा प्रयोग त्यांनी गोमंतकामध्ये यशस्वी करून दाखविला होता.
नारायणबुवा बर्वे व कीर्तन असे समीकरणच निर्माण झाले होते. आवाजामध्ये भारदस्तपणा, मराठीवरील प्रभुत्व व विषयाचा सखोल अभ्यास याच्या जोरावर त्यांचे कीर्तन प्रभावी ठरायचे. नारायणबुवा बर्वे यांनी अनेक कीर्तनकार निर्माण केले. गोवा मराठी अकादमी, हरिभक्त पारायण, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला होता. डोक्यावर टोपी, धोतर व पांढरा कुर्ता अशा वेशभूषेमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलून दिसत होते. त्यांच्या निधनामुळे कीर्तनपरंपरेचे मोठे नुकसान झालेले आहे. गोवा मराठी अकादमी त्याचबरोबर अनेक मराठी प्रेमींनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









