मुर्डीतील ग्रामस्थ विरोधावर ठाम, मंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन केली चर्चा
प्रतिनिधी/ फोंडा
ग्रामस्थांचा विरोध असतानाही मुर्डी खांडेपार गावात 144 कलम म्हणजेच जमावबंदी लागू करून जलसंवर्धन खात्यातर्फे बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामस्थ मात्र आपल्या विरोधावर ठाम असून शनिवारी शंभरहून अधिक ग्रामस्थांनी स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेत, त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. बंधाऱ्यामुळे गावाला पुराच्या आपत्तीचा वाढता धोका आहे, तसेच काही लोकांच्या उदरनिर्वाहाची साधनेही नष्ट होणार आहेत. त्यामुळे मुर्डी गावात बंधारा नकोच व जमावबंदी तत्काळ उठवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मंत्री रवी नाईक यांनी हस्तक्षेप करावा
स्थानिक आमदार या नात्याने मंत्री रवी नाईक यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. खडपाबांध-फोंडा येथील मंत्री नाईक यांच्या कार्यालयात जमलेल्या ग्रामस्थांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामस्थांना अंधारात ठेवून जलसंवर्धन खात्यातर्फे चार वर्षांपूर्वी बंधाऱ्यासाठी भूसर्वेक्षण व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता जमावबंदी लागू कऊन जबरदस्तीने हा बंधारा बांधला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. 2021 मध्ये खांडेपार नदीला आलेल्या महापुरात गावातील बहुतेक घरे पाण्याखाली गेली होती. काही घरे पूर्ण जमीनदोस्त होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पाणी ओसरेपर्यंत आम्हाला रानात व देवळात आसरा घेऊन दिवस काढावे लागले. गावातील नागरिकांच्या मनात अजूनही या महापुराची भीती व जखमा ताज्या आहेत. गावात साधारण तीनशे घरे असून बंधाऱ्यामुळे बहुतेक घरांना पुराचा धोका संभवत आहे. शिवाय बंधाऱ्यामुळे नदीच्या पात्रातून पूर्वापार खुबे काढण्याचा व्यवसाय कायमचा संकटात येणार आहे. नदी पात्रातील खुबे काढून व काठावर उगवणारी आकुर ही भाजी तोडून उदरनिर्वाह करणाऱ्या गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसायही धोक्यात येणार आहे. सरकार भलेही या प्रकल्पामुळे पुराचा धोका नसल्याचे सांगत असले, तरी आम्हाला त्यावर विश्वास नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. बंधारा बांधून सरकार गाव बुडवू पाहत असल्याचा आरोपही संतप्त ग्रामस्थांनी केला.
तुमच्या फायद्यासाठी आमचे गाव का बुडविता ?
मुर्डी गावात उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचा स्थानिकांना कुठलाच फायदा नाही. शेजारील प्रियोळ मतदारसंघात सावईवेरे व भूतखांब केरी परिसरात होऊ घातलेल्या एका पर्यटनीय प्रकल्पाला पाणी वळविण्यासाठी बंधारा उभारण्याचा चाललेला हा खटाटोप आहे. मुर्डी गावाला लागूनच प्रियोळ मतदारसंघातील वाघुर्मे गाव आहे. मुर्डी गाव बुडवून हा बंधारा उभारण्यापेक्षा, तेथील आमदारांनी तो आपल्या मतदारसंघात अवश्य उभारावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बंधाऱ्यासंबंधी आपण अनभिज्ञ : मंत्री रवी नाईक
मंत्री रवी नाईक यांनी ग्रामस्थांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर येत्या दोन दिवसांत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री व जलसंवर्धन मंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडाव्यात. ज्यावेळी बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी दिली होती, तेव्हा कुणीही आपल्यापुढे हा विषय मांडलेला नव्हता. शिवाय सध्या सुरू केलेल्या बांधकामासंबंधीही आपल्याला कुणीही विश्वासात घेतलेले नाही. ग्रामस्थांना मुर्डी गावात बंधारा नको असल्यास त्यांची मुख्यमंत्री व जलसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांशी भेट घडवून आणली जाईल. ग्रामस्थांनी चर्चा करून आपले मुद्दे व्यवस्थितपणे मांडावेत, असे रवी नाईक यांनी सांगितले. यावेळी फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टी खांडेपार पंचायतीच्या सरपंच संजना नाईक, स्थानिक पंचसदस्य अभिजित गावडे, हरिष नाईक व मनिष नाईक आदी उपस्थित होते.
पंचायत ग्रामस्थांसोबत : अभिजित गावडे
स्थानिक पंचसदस्य अभिजित गावडे यांनी पंचायतीला बगल देऊन जलसंवर्धन खात्याने बंधाऱ्याचे सोपस्कार पूर्ण केल्याचे सांगितले. पंचायतीकडून त्यांना कुठलाच परवाना दिलेला नाही. प्रत्यक्ष माती चाचणी व अन्य कामे सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांना या प्रकल्पाचा सुगावा लागला व ग्रामसभेत लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला. ग्रामस्थांना बंधारा नको असल्यास पंचायत ग्रामस्थांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









