बाळेकुंद्री / वार्ताहर
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवस्थानात श्रावणमासानिमित्त एक महिना चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ गुरूवारी करण्यात आला. बुधवारी रात्री यल्लम्मा देवीची विशेष पूजा करण्यात आली. ब्राम्ही मुहूर्तावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांना संधी देण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. कांही भाविकांनी दीड नमस्कार घालून आपली मनोकामना पूर्ण केली.
श्रावणमासानिमित्त दर्शनासाठी भाविकांची डोंगरावर रीघ लागणार आहे. श्रावणमासाच्या पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. मंगळवार व शुक्रवारी विशेष गर्दी राहणार आहे. मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसपीबी महेश यांनी तरूण भारतशी बोलताना म्हणाले की, श्रावण मासानिमित्त भाविकांची संख्या जास्त राहणार आहे. पाच लाखाहून अधिक भाविक डोंगरावर उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्याच्या दुष्टिकोनातून बसची सोय, वीज, आरोग्य व स्वच्छता आदी सुविधा पुरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. श्रावणमासाच्या काळात यल्लम्मा देवस्थानाला विशेष महत्त्व असून देवीची विविध स्वरूपात अलंकारीत आरास करून देवीची विशेष पूजा बांधण्यात येणार आहे.









