वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असून उभय संघामध्ये वनडे मालिका आणि टी- 20 मालिका होणार आहेत. या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा 15 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला असून हंगामी कर्णधार सुने लुसला कर्णधार पदावरून बाजूला करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका महिला संघाच्या या दौऱ्याला 1 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. पाकच्या दौऱ्यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार असून हे सर्व सामने कराचीत होणार आहेत. चालूवर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुने लुसच्या नेतृत्त्वाखाली यजमान दक्षिण आफ्रिकेने अंतिमफेरी गाठली होती. त्यांना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पाकच्या दौऱ्यामध्ये 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान तीन टी-20 सामने तर 8 ते 14 सप्टेंबर दरम्यान तीन वनडे सामने खेळविले जातील. या दौऱ्यासाठी नवोदित यष्टीरक्षक रिडेरला संधी देण्यात आली आहे. या आगामी दौऱ्यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिका नव्या कर्णधाराची घोषणा लवकरच करणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघ – बॉश्च्, ब्रिटस्, डी. क्लर्क, रिडेर, गुडॉल, जेफ्ता, कॅप, खाका, क्लेश, सुने लूस, मलाबा, सेखूहुने, शेनगेशी, टकेर आणि वूलव्हर्ट.









