वृत्तसंस्था / सिनसिनॅटी (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष विभागात जर्मनीच्या व्हेरेव्हने तसेच महिलांच्या विभागात अमेरिकेच्या कोको गॉफने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. पोलंडची टॉप सिडेड स्वायटेक तसेच ग्रीकची मारीया सॅकेरी यांनीही आपले विजय नोंदविले.
पुरूष एकेरीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने अॅड्रीयन मॅनेरिनोचा 6-2, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. व्हेरेव्हने गेल्यावर्षी फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेनंतर मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोव्हिचने तब्बल दोन वर्षांनंतर अमेरिकेतील या स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविताना तिसरी फेरी गाठली. जेकोव्हिच आणि स्पेनचा फोकीना यांच्यातील झालेल्या सामन्यात जोकोव्हिचने पहिला सेट 6-4 असा जिंकल्यानंतर फोकीनाला पाठदुखापतीची समस्या सुरू झाल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. 2021 नंतर प्रथमच जोकोव्हिच अमेरिकेच्या भूमीवर टेनिस खेळत आहे. यापूर्वी कोरोना संदर्भातील नियमामुळे जोकोव्हिचला अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला होता. जोकोव्हिचचा पुढील सामना फ्रान्सच्या मोनफिल्स बरोबर होणार आहे. या विजयानंतर आता जोकोव्हचने ट्युरीनमध्ये 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एटीपी टूरवरील या अंतिम स्पर्धेसाठी यावेळी पात्र ठरणारा जोकोव्हिच हा दुसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी स्पेनच्या अॅलकॅरेझने आपली पात्रता सिद्ध केली आहे. मोनफिल्सने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मीनॉरचा 7-5, 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले आहे. इटलीच्या आठव्या मानांकीत जेनीक सिनेरला सर्बियाच्या लेजोव्हिककडून पराभव पत्करावा लागला. लेजोव्हिकने सिनेरचा 6-4, 7-6 (7-4) असा पराभव करत पुढील फेरी गाठली. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स प्युरसेलने नॉर्वेच्या रूडचा 6-4, 3-6, 6-4, रशियाच्या मेदव्हेदेवने इटलीच्या मुसेटीचा 6-3, 6-2, ग्रीकच्या सित्सिपेसने अमेरिकेच्या शेल्टनचा 7-6 (7-3), 7-6 (7-2) असा पराभव केला.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या सातव्या मानांकीत कोको गॉफने पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठताना इटलीच्या जस्मीन पाओलीनीचे आव्हान 6-3, 6-2 असे संपुष्टात आणले. पोलंडच्या स्वायटेकने चीनच्या क्वीनवेनचा 3-6, 6-1, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. त्यानंतर स्वायटेकने तिसऱ्या फेरीतील सामन्यात व्होन्ड्रोसोव्हाचा सरळ सेटस्मध्ये पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. ग्रीकच्या सॅकेरीने झेकच्या मुचोव्हाचा 3-6, 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.