कारणे शोधण्यासाठी ‘आयसीएमआर’कडून संशोधन : 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या मृत्यूंची तपासणी सुरू
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संशोधन संस्था – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कोविड नंतरच्या जगात तऊणांच्या ‘अचानक मृत्यू’मागील कारण समजून घेण्यासाठी दोन पातळीवर संशोधन करत आहे. ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी यासंबंधी माहिती दिली असून 18 ते 45 वयोगटातील मृत्यूंचा तपास करण्यासाठी हे संशोधन सुरू असल्याचे स्पष्ट केले. गुजरातमधील गांधीनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन समिटमध्ये (जीटीएमएस) ते बोलत होते.
‘आयसीएमआर’कडून सुरू असलेल्या संशोधन-अभ्यासांमुळे आम्हाला कोविड-19 उद्रेकाचे परिणाम समजण्यास मदत होईल. तसेच इतर मृत्यू टाळण्यास मदत होईल, असा दावा बहल यांनी केला आहे. ‘अचानक मृत्यू’ म्हणजे एखाद्या आजाराचे निदान झालेल्या व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू होणे. तसेच रुग्णाचे नेमके आजारपण माहीत नसणे किंवा तो निरोगी असतानाही त्याचा मृत्यू ओढवणे. ‘आयसीएमआर’ने आत्तापर्यंत नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये 50 शवविच्छेदनांचा अभ्यास पूर्ण केला आहे. पुढील काही महिन्यांत आणखी 100 शवविच्छेदन तपासण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या शवविच्छेदन अहवालांची मागील वर्षांच्या किंवा कोविडपूर्व वर्षांच्या अहवालांशी तुलना करून अचानक मृत्यूमागील कारणे किंवा फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘आयसीएमआर’ गेल्या एका वर्षात 18 ते 45 वयोगटातील आकस्मिक मृत्यूंच्या डेटाचा आधार घेत आहे. सदर डाटा भारतातील वेगवेगळ्या भागातील 40 केंद्रांकडून मिळवला जात आहे.









