अमित शहा विधानसभा निवडणुकीची अंतिम योजना मांडणार
वृत्तसंस्था/ भोपाळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार, 20 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’ जारी करणार आहेत. शहा रविवारी सकाळी राज्याच्या दौऱ्यावर दाखल होणार असून ते नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मतदारसंघातील ग्वाल्हेरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.
आपल्या दौऱ्याच्या प्रारंभी अमित शहा सुरुवातीला भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’ जारी करतील. त्यानंतर भोपाळहून ग्वाल्हेरला रवाना होतील. ग्वाल्हेरमधील राज्य कार्यकारिणी बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीसांना आमंत्रित करण्यात आले आहे. सुमारे 1,500 पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आले असून आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष आपला अंतिम आराखडा सादर करणार आहे. निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणीची ही शेवटची बैठक असणार आहे.