‘बॉर्डर 2’साठी जेपी दत्ताशी हातमिळवणी
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. 22 वर्षांच्या प्रतिक्षेचे फळ सनी देओलच्या हाती आले आहे. ‘गदर 2’ने 300 कोटींचा गल्ला जमवून निर्मात्यांना खूश केले आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. तारा आणि सकिना या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. याचदरम्यान, सनी देओलच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

‘गदर 2’नंतर आता सनी देओल ‘बॉर्डर 2’ घेऊन येत आहे. एका वेब पोर्टलनुसार, सनी देओलने जेपी दत्ता आणि निधी दत्ताशी हातमिळवणी केली आहे. भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी हे त्रिकूट एकत्र येत आहे. ज्यांनी सनी देओलचा बॉर्डर हा चित्रपट पाहिला आहे त्यांना या चित्रपटाचे वेड लागले आहे. बॉर्डर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला तर सनी देओलच्या चाहत्यांसाठी ही एका धमाकेदार बातमीपेक्षा कमी नाही. गेल्या 2-3 वर्षांपासून टीम बॉर्डरच्या सिक्वेलची चर्चा करत आहे. मात्र आता निर्मात्यांनी कंबर कसली असून लवकरच ते या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, टीमला 1971 च्या भारत-पाक युद्धाची कथा सापडली आहे. ही कथा अजून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलेली नसून आता ती ‘बॉर्डर 2’मध्ये अप्रतिम पद्धतीने दाखवता येईल, असा कयास व्यक्त केला जात आहे. ‘बॉर्डर 2’ची निर्मिती जेपी दत्ता आणि निधी दत्ता संयुक्तपणे करणार आहेत.









