पुणे / वार्ताहर :
वानवडी येथील तडीपार गुंडाच्या खून प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात खून झालेल्या गुंडाचे वडिल, त्याचा छोटा भाऊ आणि इतर तीन जण जखमी झाले आहेत. भर रस्त्यात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. स्वातंत्र्यदिनीच एका गुंडाचा मंगला थिएटरसमोर निर्घुन खून करण्यात आला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते.
अजीम वजीरअली शेख (25, सय्यदनगर, हडपसर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी सादीक शेख (56, रा. हडपसर), अनिस शेख (32, रा. हडपसर), शाकीर कादर सय्यद (30, रा.हडपसर), मोहनसीन शेख (24) आणि शेहबाज शेख (28 ) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजीम शेख याला 30 डिसेंबर 2021 रोजी दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते. यामुळे तो सोलापूर येथे रहात होता. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता तो वडिल वजीरअली शेख यांना भेटायला आला होता. दरम्यान, अजीम शेखचा छोट्या भावाच्या मित्राचा नातेवाईक भाजी आणण्यासाठी बाजारात गेल्यावर त्यांची आरोपी अमीर खान आणि त्याच्या साथीदारांसोबत भांडणे झाली होती. यानंतर त्याने वजीरअली शेख यांना फोन करुन बोलावून घेतले. वजीरअली शेख जाताना दोन्ही मुलांना आणि त्यांच्या मित्रांना घेऊन गेले. तेथे गेल्यावर वाद विकोपाला गेला. आरोपींनी अजीम शेखला तलवार आणि धारदार शस्त्राने वार करुन ठार मारले. तर वजीरअली शेख, रेहान खान, शकील अन्सारी, शाहरुख शेख यांच्यावरही तलवार आणि धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जखमी केले. यामध्ये अल्ताफ उर्फ नोडी शेख याच्या हाताचा अंगठा कापला गेला. जाताना आरोपींनी ‘हम यहा के भाई है, असे म्हणत दहशत माजवून पळ काढला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पाटणकर करत आहेत.









