‘पेपर स्प्रे’ प्रकरण : हायस्कूल व्यवस्थापनाचा निर्णय. सखोल चौकशीसाठी समिती
डिचोली : डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी घडलेल्या कथित ‘पेपर स्प्रे’ प्रकरणाचे पडसाद काल शुक्रवारीही उमटले. सकाळी विद्यालयात झालेल्या व्यवस्थापन व शिस्तपालन समितीच्या बैठकीनंतर प्राथमिक स्तरावरील चौकशीत या प्रकरणात हात असल्याचा संशय आढळलेल्या चार विद्यार्थ्यांना, तर बॅगेत ‘ई सिगारेट’ आढळून आलेल्या एका विद्यार्थिनीला एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. शिस्तपालन समिती व व्यवस्थापनाने सदर निलंबनाचा निर्णय जाहीर केला. या प्रकरणाचे पडसाद काल शुक्रवारीही डिचोलीत उमटले. सकाळी विद्यालयात मोठ्या संख्येने पालकांनी गर्दी करून विद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन समितीतील सदस्य यांच्याशी चर्चा करून या विषयावर स्पष्टीकरण मागितले. सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लावून धरला. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
गुरुवार दि. 17 ऑगस्ट रोजी डिचोलीतील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेच्या वर्गामध्ये सदर प्रकार घडला होता. अज्ञाताने या वर्गामध्ये खिडकीतून पेपर स्प्रे मारल्याने वर्गातील 11 विद्यार्थिनींची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यातील 8 जणांना म्हापसा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 8 पैकी 6 जणांना घरी पाठविण्यात आले होते. तर दोघाजणांना जिल्हा रुग्णालयात ठेवले होते. त्यातील एकाची प्रकृती रात्री अधिकच बिघडल्याने तिला बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले होते. या दोघांनाही काल शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विद्यालयात व्यवस्थापन मंडळ, शिस्तपालन समितीची बैठक
या प्रकरणी शुक्रवारी काहीतरी निर्णय व्यवस्थापन समितीकडून अपेक्षित होता. या प्रकरणात गुंतलेल्या चार विद्यार्थ्यांची नावे समोर आली होती. त्यामुळे या चारही जणांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता होती. काल विद्यालयात व्यवस्थापन मंडळाची, प्राचार्य व शिस्तपालन समितीसह बैठक झाली. या बैठकीत सर्व प्रकारावर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर या चारही जणांना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले.
एका विद्यार्थिनीकडे आढळून आली चक्क ‘ई सिगारेट’
गुरुवारी दुपारी हे प्रकरण घडल्यानंतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या चौकशीत व तपासात एका विद्यार्थिनीच्या बॅगेत चक्क ‘ई सिगारेट’ आढळून आली. त्यामुळे सर्वचजण चक्रावून गेले आहे. या ई सिगारेटबाबत सदर विद्यार्थिनीने आपल्यापरीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यवस्थापन व शिस्तपालन समितीने विद्यालयात अशा प्रकारच्या बंदी असलेल्या वस्तू बाळगल्याप्रकरणी त्या विद्यार्थिनीलाही एक महिन्यासाठी निलंबित केले.
राज्यसभा खासदार, शिक्षण उपसंचालकांची विद्यालयाला भेट
राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाची सर्व स्तरावर दखल घेण्यात आली आहे. काल शुक्रवारी सकाळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देऊन व्यवस्थापन मंडळाशी चर्चा केली व संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. याविषयी सविस्तर बोलण्याचे त्यांनी टाळले, पण घडलेला प्रकार खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले. शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर यांनीही विद्यालयात भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. व्यवस्थापन मंडळाला आवश्यक सूचनाही केल्या.
चौकशीअंती मिळालेल्या माहितीच्या आधारे निलंबन
श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव चांगले आहे. निकालही चांगला लागतो. परंतु गुरुवारी घडलेले प्रकरण दुर्दैवी आहे. या प्रकरणात संशयास्पद आढळलेल्या चार जणांना एक महिन्यासाठी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तसेच अन्य विद्यार्थ्याकडे केलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर या विद्यार्थ्यांना निलंबित केले होते. या प्रकरणी आता कसून चौकशी करण्यात येणार असून हे विद्यार्थी त्यात खरोखर दोषी आढल्यास त्यांना विद्यालयातून काढून टाकण्याचीही कारवाई केली जाणार, असे विद्यालयाचे प्राचार्य ओर्लांडो मिनेझिस यांनी सांगितले. यावेळी शिस्तपालन समितीच्या रोमाना मास्कारेहस, शर्मिला परब यांचीही उपस्थिती होती.
प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर करणार
विद्यालयात घडलेला प्रकार गंभीर असल्याने व्यवस्थापन मंडळाने लगेच पावले उचलली आहेत. तत्काळ बैठका घेऊन चार विद्यार्थी व एका विद्यार्थिनीला निलंबित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय हाती घेतले जाणार आहेत. सध्या नव्याने 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर सर्व वर्गांमध्ये व इतर ठिकाणी असते 22 सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविले जाणार आहे. या सर्वाचा अहवाल शिक्षण खात्याला पाठविला जाणार आहे, असे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.
पालक, विद्यार्थी अजूनही भीतीच्या छायेत
या विद्यालयात यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी अशाच प्रकारचे प्रकरण घडले होते. आसाच पेपर स्प्रे मारण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना समज देण्यात आली होती.त्यानंतरही असा धाडसी प्रकार घडणे आणि त्यात विद्यार्थिनींची प्रकृती बिकट होणे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी विद्यालयाची असते. मात्र विद्यालयातच अशी प्रकरणे घडू लागली तर आमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी कोणाकडे पहावे, अशा प्रतिक्रिया विद्यालयात जमलेल्या पालकांनी व्यक्त केल्या. या प्रकारामुळे पालक व विद्यार्थीही भीतीच्या छायेत आहेत.









