15 हजारात उत्तर भारतातील तीर्थस्थळांना देता येणार भेट
बेळगाव : उत्तर भारतातील काशी, गया, अयोध्या व प्रयागराज या तीर्थस्थळांना सवलतीच्या दरात रेल्वेप्रवास करण्याची संधी कर्नाटक राज्य सरकारने ‘कर्नाटक भारत गौरव’ या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना अवघ्या 15 हजार रुपयांमध्ये तीर्थस्थळांना भेटी देता येणार आहेत. विशेष म्हणजे ही एक्स्प्रेस बेळगावमध्येही थांबणार असल्याने बेळगावमधील नागरिकांना तीर्थस्थळांना भेटी देता येतील. मागील सरकारने भारत गौरव यात्रा योजना अंमलात आणली. हीच संकल्पना आता या सरकारनेही पुढे चालविली आहे. मागील सरकारने या संकल्पनेसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले होते. त्यामध्ये नवीन राज्य सरकारने अडीच हजारांची भर घालत 7500 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे 22500 रुपयांची यात्रा नागरिकांना केवळ 15 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
एकूण नऊ दिवस या प्रवासाचा कालावधी असेल. नागरिकांना दर्शनासह जेवणाची सोय याच पॅकेजमधून केली जाणार आहे. नागरिकांना वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरांची यंत्रणा कार्यरत असेल. याचबरोबर प्रवाशांना एसी रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येईल. यशवंतपूर, तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी, बेळगाव व रायबाग या रेल्वेस्थानकांवरून या भारत गौरव एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना चढता येईल. 29 ऑगस्ट रोजी निघालेली भारत गौरव एक्स्प्रेस तीर्थस्थळांना भेटी देऊन 6 सप्टेंबर रोजी पुन्हा कर्नाटकात परतेल. तसेच 29 सप्टेंबर रोजी निघालेली दुसरी भारत गौरव एक्स्प्रेस तीर्थाटन संपवून 1 ऑक्टोबर रोजी कर्नाटकात परतेल. भारतीय रेल्वे तसेच आयआरसीटीसीच्या सहयोगाने कर्नाटक सरकारने भारत गौरव एक्स्प्रेस सुरू केली आहे. ज्या भाविकांना या एक्स्प्रेसमधून तीर्थाटन करायचे असेल त्यांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करावे किंवा 8595931291 या क्रमांकाशी संपर्क साधावा.









