दीनदयाळ अंत्योदय–राष्ट्रीय नगर जीवनोपाय अभियानांतर्गत एनजीओंचे मानवतेचे कार्य
बेळगाव : वृद्ध असो वा तरुण, ते जर निराधार असतील तर त्यांना केंद्र सरकार दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नगर जीवनोपाय अभियानातर्फे राहण्यासाठी आसरा दिला जातो. महानगरपालिका व एनजीओंच्या माध्यमातून निराधारांना आधार दिला जातो. अशा एनजीओंमध्ये सध्या एकूण 70 जण आसरा घेत आहेत, अशी माहिती अधिकारी प्रकाश मरकट्टी यांनी दिली. बेंगळूर येथील राष्ट्रीय शहर क्षेमाभिवृद्धी अभियानांतर्गत तसेच केंद्र सरकारच्या योजनेतून निराधारांना आधार दिला जात आहे. नैसर्गिक आपत्ती अथवा विविध कारणांनी संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामधील एखादी व्यक्ती जिवंत राहते. तिला कोणताच आधार नसतो. ना आई, वडील, ना मुले, ना भाऊ यामुळे ते एकाकी पडतात. यामुळे पुढे काय करायचे? असा प्रश्न त्यांना भेडसावतो. अशा व्यक्तींना या योजनेतून राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. ते दिवसभर काम करून सायंकाळी त्या निराधार केंद्रामध्ये आसरा घेतात, तर काही वृद्ध दिवसभर निराधार केंद्रात राहून आपले जीवन जगत असतात. महापालिका अशा निराधारांची उत्तम प्रकारे सेवा करत आहे. याबद्दल राज्य सरकारकडून नुकताच त्यांना पुरस्कारही मिळाला. महापालिका आणि एनजीआंsच्या माध्यमातून शहरात एकूण पाच केंद्रे सुरू आहेत. त्यामध्ये पुरुषांसाठी चार तर महिलांसाठी एक असल्याचे अधिकारी प्रकाश मरकट्टी यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध सामाजिक संघटना निराधार असल्याची माहिती आम्हाला देतात. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांची विचारपूस करतो. कोणीच नसल्यामुळे ते एकाकी पडतात. त्यांना आम्ही आधार देतो.
मनपा माध्यमातूनच एनजीओला चालना
महानगरपालिकेच्या माध्यमातूनच ही एनजीओ आम्ही चालवितो. एनजीओ चालकही आम्हाला वेळोवेळी मदत करतात. कारण अशा निराधार लोकांना जेवण, राहण्याची सर्व सोय ते करत असतात. एक मोठा आधारच या निराधारांना ते देत असतात. आतापर्यंत योग्य प्रकारे त्यांचे कामकाज सुरू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. आजपर्यंत अनेक जण या निराधार केंद्रामध्ये राहूनच जीवन व्यतित करत आहेत.
70 जणांना आसरा
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी याचबरोबर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निराधार केंद्राचे काम करत असतो. भाजप सरकार असताना आमच्या या कार्याची दखल घेतली व आम्हाला पुरस्कारही दिला आहे. एकूण 1 लाख 25 हजार रुपये आम्हाला सरकारतर्फे बहुमान म्हणून रक्कम देण्यात आली. वृद्ध व निराधारांची चांगल्या प्रकारे सोय केल्याची ही पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आमच्या एनजीओमध्ये 70 जण आसरा घेत आहेत. यामधील काही जण दिवसभर काम करून सायंकाळी आसरा केंद्रात राहतात. त्यांना सर्व ती सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वैद्यकीय तपासणी करूनच दाखल
एनजीओच्या माध्यमातून निराधार केंद्रात दाखल करताना आम्ही प्रथम संबंधिताची वैद्यकीय तपासणी करतो. वैद्यकीय अहवालानंतरच त्यांना आम्ही दाखल करून घेतो. कोणत्याही प्रकारची व्याधी असल्यास संबंधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यानंतर त्यांना निराधार केंद्रामध्ये ठेवतो. जेणेकरून एकापासून दुसऱ्याला संसर्गजन्य आजार बळावणार नाही, याची दखल आम्ही घेतो. कोणालाही आजार झाल्यास तातडीने त्याच्यावर उपचार करण्यासाठी संबंधित परिसरातील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना आम्ही पाचारण करतो. निराधार व्यक्तींना दोनवेळचे जेवण, नास्टा, चहाची सोय केली जाते. आंघोळीला गरम पाणी दिले जाते. बऱ्याच वेळा परजिल्ह्यातून किंवा तालुक्यातून या ठिकाणी काही जण शहरात तसेच एकांतात कोठे तरी रस्त्यावरच राहत असतात. अशा लोकांनाही सहारा देण्याचा प्रयत्न केला जातो. निराधार शोधण्यासाठी आम्ही रॅपिड सर्व्हे करत असतो. त्या माध्यमातून आधार नसलेल्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना एनजीओमध्ये दाखल करतो. सर्व प्रकारची काळजी घेण्याचे काम एनजीओचे चालक करत असतात. काही अडचणी आल्यास ते आमच्याशी संपर्क साधतात. त्यानंतर आम्ही त्या अडचणी दूर करतो.
निराधारांसाठी शहरातील एनजीओ…
सध्या शहरात एकूण पाच एनजीओ आहेत. त्यामध्ये या सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. येडियुराप्पा मार्ग येथील एनजीओ पुरुषांसाठी आहे. त्या ठिकाणी एकूण 23 जणांनी आसरा घेतला आहे. पी. बी. रोडवरील महावीर बिल्डिंगमधील माणिकबाग बोर्डिंगमध्ये पुरुष 11, रामतीर्थनगर येथील बुडा प्लॉटमध्ये 10 पुरुष, श्रीनगर येथील आसरा केंद्रामध्ये 14 महिला, महांतेशनगर येथील आसरा केंद्रामध्ये 12 पुरुषांची सध्या व्यवस्था पाहिली जात आहे.









