नगरसेविका वैशाली भातकांडे यांची मागणी
बेळगाव : कपिलेश्वर मंदिरमागील बाजूस असलेल्या तलावाला संरक्षक भिंत बांधावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकवेळा मागणी केली आहे. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनीही नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याची मागणी केली. मात्र अद्याप याबाबत कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तातडीने महापालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करावी, तसेच संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयात वाद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तसा कोणताही वाद नाही. गोडसे कुटुंबीयांची ही जागा असून त्यांनी महापालिकेला 15 डिसेंबर 2022 मध्ये लिहून दिली आहे. या तलावाला संरक्षक भिंत बांधून घेण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे. याचबरोबर महापालिकेला कब्जा देखील दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. तलावात बुधवारी दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्याचे महापालिकेच्या सभागृहामध्ये पडसाद उमटले होते. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी या तलावाबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. आमदार राजू सेठ यांनीही याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि आराखडा तयार करून संरक्षक भिंत बांधावी, असे अधिकाऱ्यांना सांगितले. यापूर्वी माजी आमदार अनिल बेनके यांनीही पाहणी करून त्यावेळी आराखडा तयार करण्याची सूचना केली होती. 70 लाख रुपयांचा आराखडाही तयार केला होता. मात्र त्यानंतर कोणतीच कारवाई केली नाही. यापूर्वी अनेकांचा या तलावात बुडून मृत्यू झाला आहे. तेव्हा तातडीने संरक्षण भिंत बांधण्याची मागणी होत आहे.









