खानापूर तहसीलदार-इतर मागासवर्गीय खात्याच्या अधिकाऱ्यांना ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन
खानापूर : आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येथील देवराज अर्स भवनात आपले कार्यालय गुरुवार दि. 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन केले होते. या आमदारांच्या कार्यालयास ब्लॉक काँग्रेसने आक्षेप घेतला असून हे कार्यालय तातडीने बंद करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार प्रकाश गायकवाड आणि इतर मागासवर्गीय खात्याच्या अधिकारी गौरी कटापुरेमठ यांना दिले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिवाजीनगर येथील देवराज अर्स भवनात आपले आमदार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी मोठ्या थाटात केले होते. यावेळी हे कार्यालय तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र देवराज अर्स भवनातील आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या कार्यालयास ब्लॉक काँग्रेसने आक्षेप घेतला असून माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील मागासवर्गीयांसाठी हे देवराज अर्स भवन मंजूर करून ही इमारत पूर्णत्वास नेली आहे.
या ठिकाणी देवराज अर्स इतर मागासवर्गीयांसाठी हॉस्टेल, सभागृह आणि कार्यालय असून इतर मागासवर्गीयांच्या बैठका तसेच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी सभागृहाचे नियोजन करण्यात आले आहे. असे असताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी संबंधित खात्याची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी आपले कार्यालय सुरू केले आहे. आमदारांसाठी तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात कार्यालय असतानादेखील जाणीवपूर्वक या ठिकाणी कार्यालय करण्याचा अट्टाहास आमदारांनी केला असल्याचा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी आरोप केला आहे. तसेच जर येत्या दोन दिवसात संबंधित खात्याने आमदार हलगेकरांचे कार्यालय येथून हलविले नसल्यास ब्लॉक काँग्रेसच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळी यांनी दिला आहे.









