आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षाची कारकीर्द पूर्ण : जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या विराटवर शुभेच्छांचा वर्षाव
वृत्तसंस्था/ मुंबई
टीम इंडियाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी (18 ऑगस्ट) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पंधरा वर्षे पूर्ण केली. याच दिवशी त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. अंडर 19 संघाचा विश्वविजेता कर्णधार म्हणून सुरु केलेला प्रवास, वर्तमान क्रिकेटमधील जगातील सर्वात यशस्वी फलंदाज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये दीड दशकाची कारकिर्द पूर्ण केलेल्या विराटला दिग्गज खेळाडूंसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
2008 मध्ये अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघाने विजय संपादन केला होता. या संघाचे नेतृत्व करत असलेल्या विराटने फलंदाजीत देखील आपला दबदबा दाखवून दिला होता. आक्रमक शैली असलेल्या विराटला यानंतर याच वर्षी झालेल्या श्रीलंका दौऱ्यासाठी संधी मिळाली. पहिल्या सामन्यात केवळ बारा धावा करून बाद झालेला विराट पुढे जाऊन विश्वविक्रमी कामगिरी करेल, याची कल्पना अनेकांना आली नव्हती. यानंतर 2011 वनडे विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावून सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारताच्या विश्वविजयात त्याचे मोलाचे योगदान राहिले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
ऑस्ट्रेलियाला मायदेशात नमवण्याची कामगिरी
2012 आशिया चषक पाकिस्तान विरुद्ध केलेली 183 धावांची अजरामर खेळी, होबार्ट येथे श्रीलंकेविरुद्ध ठोकलेले वादळी शतक त्याचा दर्जा दाखवून देणारे होते. कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळातच ऑस्ट्रेलियात जाऊन शतक ठोकण्याची अद्वितीय कामगिरी त्याने केली. कर्णधार बनल्यानंतर त्याने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेले. इंग्लंडमध्ये भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. तसेच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधार होण्याचा मान त्याला मिळाला. दोन वेळा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करूनही विजेतेपद मिळवण्यापासून विराट व भारतीय संघ वंचित राहिला.
विराटचे अतुलनीय आकडे
2021 मध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर ही विराट शानदार कामगिरी करत आहे. त्याच्या नावे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 111 सामन्यात 8676, 275 वनडेत 12898 व 115 टी 20 सामन्यात 4008 धावा जमा आहेत. तसेच जागतिक क्रिकेटमध्ये तब्बल 76 शतके समाविष्ट आहेत. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा व सर्वाधिक शतके याबाबतीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो.
विराटला दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी
जागतिक क्रिकेटमध्ये दीड दशकाची कारकिर्द पूर्ण करणाऱ्या विराटची कामगिरीही अशीच जबरदस्त राहिली आहे. विराट 2011 च्या विश्वचषक संघातही होता. धोनीच्या नेतृत्वात भारताने हा वर्ल्डकप जिंकला. यानंतर 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये कोहली कर्णधार होता. भारताचा या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभूत झाला. आता 2023 मध्ये कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या मोठ्या स्पर्धेत खेळणार आहे. सोबतच कोहलीला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची नामी संधी असणार आहे.
जाहिरातींमधून भली मोठी कमाई, सर्वाधिक ब्रँड फी
आशियामध्ये विराट आज बॉलिवूड आणि क्रीडाक्षेत्रात सर्वाधिक ब्रँड फी घेणारा खेळाडू आहे. विराट प्रत्येक जाहिरात शूटसाठी वर्षाला 7.50 ते 10 कोटी रुपये घेतो. विराटकडे सध्या एकूण 26 ब्रँड्स आहेत. यामध्ये व्हिवो, ब्लूस्टार, लक्सर, एचएसबीसी, उबर, स्टार स्पोर्ट्स, एमआरएफ आणि सिंथॉल यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. या बाबतीत तो बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहे. अशा ब्रँडसमधून तो सुमारे 175 कोटी रुपये कमावतो. याशिवाय विराट फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती संघांचाही मालक आहे.
सोशल मीडियावर बादशाह
विराट फक्त क्रिकेट आणि जाहिरातीमधून कमाई करत नाही तर तो सोशल मीडियाचा बादशहा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो कमाई करतो. सोशल मीडियाबद्दल सांगायचे झाले तर, विराट इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो. याचवेळी, ट्विटरवर तो एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो.









