वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी (अमेरिका)
सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेकने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे ट्युनेशियाची जेबॉर, व्होंड्रोसोव्हा आणि अमेरिकेची कोको गॉफ यांनी एकेरीची उपांत्यपूर्व गाठली आहे.
गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात स्वायटेकने झेंग क्विनवेनचा 3-6, 6-1, 6-1 असा पराभव केला. या स्पर्धेत स्वायटेकने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. दुसऱ्या एका सामन्यात मर्केटा व्होड्रोसोवाने स्लोनी स्टिफेन्सवर 7-5, 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. अमेरिकेच्या सातव्या मानांकित कोको गॉफने उपांत्यपूर्व फेरी प्रवेश मिळवताना 18 वर्षीय लिंडा नोसकोवाचा 6-4, 6-0 असा फडशा पाडला. गॉफला विजयासाठी 62 मिनिटे झगडावे लागले. इटलीच्या पावोलीनीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवाना कझाकस्तानच्या रिबाकिनाचा 4-6, 5-2 असा पराभव केला. दुखापतीमुळे रिबाकिनाने हा सामना अर्धवट सोडला. ट्युनेशियाच्या जेबॉरने व्हेकीकवर 5-2 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. व्हेकीकने प्रकृती नादुरुस्तीमुळे हा सामना अर्धवट सोडला. सबालेंकाने कॅसेटकिनावर 6-3, 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.